हंगेवाडीत शेतकरी मेळावा व नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेचे उद्घाटन उत्साहात संपन्न
आश्वी । झुंझार न्यूज
देशपातळीवर संगमनेर तालुक्याचे नाव एक आदर्श सहकार क्षेत्र म्हणून घेतले जाते. सहकार हा संगमनेरचा श्वास असून या संस्थांच्या माध्यमातून तालुक्यात मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. त्यामुळे सहकार संस्था जपण्याचे आणि वाढवण्याचे काम आपल्याला करायचे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते.
आपल्या भाषणात थोरात यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण झाले असून, या पाण्याचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत झाला पाहिजे, हीच आपली ठाम भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्यातील सहकाराचे कौतुक करतानाच बाळासाहेब थोरात यांनी सध्या संगमनेरमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “संगमनेरमध्ये ४३ लाख रुपयांच्या अमली पदार्थांच्या गोळ्या सापडणे, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. यामुळे तरुण पिढी लवकर आकर्षित होऊन बरबाद होण्याची भीती आहे. सत्ता येते आणि जाते, परंतु काही लोकांची प्रवृत्ती बदलत चालली आहे.”
महिला आणि वयोवृद्धांना मारहाण करणे, पोलिसांसमोर गुंडांची हाणामारी होऊनही आणि पोलिसांवर धावून जाऊनही गुन्हे दाखल न होणे, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. “या सर्वांच्या मागे नक्की कोण आहे? असा प्रश्न उपस्थित करत आता तालुका दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, कोणीही बघ्याची भूमिका घेऊ नका,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच गळ्यात घालणाऱ्या पट्ट्याच्या रंगावरून द्वेष भावना पसरवणे, जाती-धर्मात वाद वाढवणे हे योग्य नसल्याचे त्यांनी सुनावले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, “सहकार क्षेत्रातील इमारत ही कोणा एकट्याची मालकी नसते, तर त्यात सभासद आणि शेतकऱ्यांचे योगदान असते. ‘सहकार म्हणजे संगमनेर आणि संगमनेर म्हणजे सहकार’ हे समीकरण राज्यात नावारूपाला आले आहे. राज्यात कोठेही गेले तरी संगमनेर म्हटले की सहकाराची आठवण होते, म्हणून संगमनेर ही सहकाराची पंढरी मानली जाते.”
स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी सहकार उभा करण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण करून देत, बाळासाहेब थोरात हे कृषी, आर्थिक आणि राजकीय क्षेत्राला लाभलेले मौलवान नेतृत्व असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड, इद्रजितभाऊ थोरात , शरद नाना थोरात, आर. बी. रहाणे, दूध संघाचे व्हाइस चेअरमन राजेंद्र चकोर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, शिबलापूरचे सरपंच प्रमोद बोंद्रे, दिलावरभाई शेख , भिमाजी राहिंज , नवनाथ आंधळे, बबनराव कराड, राजेंद्र देशमुख, संजय खरात , संतोष नागरे , नेताजी बोस पतसंस्थेचे व्हा चेअरमन प्रतिक सांगळे , पतसंस्थेचे मॅनेजर सोमनाथ वाघ , रमेश सांगळे , नामदेवराव नागरे , नारायण नागरे , देवराम घुगे , सुभाष रोकडे ,कारभारी शेळके , सौ गितांजली केकाण ,शारदा नागरे , भिमराज केकाण , महादेव शिरसाठ ,देवराम गायकवाड , गणेश गंभीरे , चैतन्य केकाण ,ज्ञानेश्वर गंभीरे , सुवर्णा घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात आणि गणपतराव सांगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक सांगळे यांनी केले.
कार्यकर्त्यांना मिळाली नवी संजीवनी
आश्वी व जोर्वे जिल्हा परिषद गटाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या शेतकरी मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे आणि नेत्यांच्या आक्रमक भाषणामुळे थोरात गटात आलेली मरगळ दूर झाल्याचे दिसून आले. आश्वी व जोर्वे गटाच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना या मेळाव्याने एक नवी ‘संजीवनी’ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.








