आश्वी । झुंझार न्यूज

 

 

कष्टाला आणि जिद्दीला कशाचीच तोड नसते, हे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुकच्या पूनम खेमनरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पूनमची महिला प्रीमियर लीगसाठी (WPL) बलाढ्य ‘मुंबई इंडियन्स’ संघात निवड झाली आहे. तिच्या या निवडीने केवळ आश्वी गावच नव्हे, तर संपूर्ण संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पूनमच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संगमनेर येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तिचा विशेष सत्कार केला . यावेळी तिचे आई-वडील उपस्थित होते. पूनमचे औक्षण करून आणि पुष्पगुच्छ देऊन तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या मुलीचे हे यश पाहून उपस्थित पालकांचे डोळे आनंदाने पाणावले होते.

पूनमचा इथपर्यंतचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पूनमने अनेक अडचणींवर मात करत क्रिकेटची आवड जोपासली. चिकाटी, अफाट मेहनत आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यांच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पूनमचे कौतुक केले. “पूनमने मुंबई इंडियन्ससारख्या प्रतिष्ठित संघात स्थान मिळवून ग्रामीण भागातील मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. संधी मिळाली तर ग्रामीण मातीतील मुलीही आकाशाला गवसणी घालू शकतात, याचे पूनम हे जिवंत उदाहरण आहे. तिचे हे यश अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक मुलीला नवी स्वप्नं बघण्याची व ती पूर्ण करण्याची ऊर्जा देईल,” अशा भावना व्यक्त केली .

मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये खेळताना पाहण्यासाठी आता आश्वीसह संगमनेरकर आतुर झाले असून, तिच्या या उत्तुंग भरारीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed