काल्याच्या महाप्रसादासाठी जय्यत तयारी

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे सुरू असलेल्या ब्रम्हालिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या १९ व्या फिरत्या नारळी सप्ताहामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे. आज सप्ताहाचा सहावा दिवस असून, भाविकांच्या प्रचंड गर्दीने दाढ खुर्द गाव गजबजले आहे. आज एकाच दिवसात सुमारे १२ हजार भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

दाढ खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या या १९ व्या फिरत्या नारळी सप्ताहात दिवसेंदिवस गर्दीचा उच्चांक मोडला जात आहे. आज सहाव्या दिवशी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. भजन, कीर्तन आणि प्रवचनाच्या सुरावटीने वातावरण मंगलमय झाले असून, परिसरातील अनेक गावांमधून भाविक या सोहळ्यासाठी दाखल होत आहेत. आजच्या पंगतीत १२ हजार भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला, ज्यात शिस्तबद्ध नियोजनाचे दर्शन घडले.

येत्या मंगळवारी, दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांच्या किर्तनाने या भव्य सप्ताहाची सांगता (समाप्ती) काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. सांगता सोहळ्याच्या दिवशी हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याने गावकऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. काल्याच्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने विशेष ‘बुंदीच्या महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

काल्याच्या दिवशी होणारी संभाव्य गर्दी आणि महाप्रसादाचे मोठे स्वरूप लक्षात घेता, गावकऱ्यांनी नियोजनपूर्वक तयारी केली आहे. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी ताजा आणि रुचकर महाप्रसाद मिळावा, यासाठी शनिवारपासूनच बुंदी काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गावातील आचारी आणि स्वयंसेवक महिला व तरुण अहोरात्र सेवा देत असून, या सोहळ्यासाठी संपूर्ण गाव एकवटले चित्र दिसत आहे.


येत्या मंगळवारी होणाऱ्या सांगता सोहळ्यासाठी आणि महाप्रसादासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दाढ खुर्द ग्रामस्थ आणि सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed