सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम: स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपणाने वेधले लक्ष

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे ब्रम्हालिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या १९ व्या फिरत्या नारळी सप्ताहात भक्ती आणि समाजसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा जपत काढलेली दिंडी आणि त्यानंतर राबवलेली स्वच्छता मोहीम सध्या पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरली आहे.

सध्या दाढ खुर्द येथे १९ वा फिरता नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात सुरु असून, जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून भाविक याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत. या धार्मिक सोहळ्यात केवळ अध्यात्मच नाही, तर सामाजिक भानही जपले जात असल्याचे सह्याद्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.

सप्ताहाच्या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून सप्ताह स्थळापर्यंत भव्य दिंडी काढली होती. या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी परिधान केलेला विठोबा आणि रुक्मिणी मातेचा पेहराव. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर लयबद्ध कसरती सादर केल्या. त्यांचे हे कलात्मक सादरीकरण पाहण्यासाठी ग्रामस्थांनी दुतर्फा गर्दी केली होती. चिमुकल्यांच्या या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

केवळ दिंडी काढून हे विद्यार्थी थांबले नाहीत, तर त्यांनी सप्ताह स्थळाच्या १२ एकर विस्तीर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून “स्वच्छ भारत” चा संदेश दिला. यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सप्ताह स्थळी तब्बल १०० वृक्षांचे रोपण केले. ओसाड माळरानावर हिरवाई फुलावी आणि येणाऱ्या भाविकांना सावली मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.


सप्ताहासाठी उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर केवळ शिक्षणाचेच नाही, तर सामाजिक व आध्यात्मिक संस्कारही होत असल्याचे मत ह.भ.प. दत्तगिरी महाराज व वारकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी स्कूलअध्यक्ष डॉसंजय सांगळे , शिक्षक, ग्रामस्थ आणि सप्ताह समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed