साकूर । झुंझार न्यूज
बालदिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आत्मीय संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी चिमुकल्यांसोबत वेळ व्यतीत करण्याचा आनंद घेतला. त्यांना विद्यार्थ्यांच्या निरागस हास्यात, त्यांच्या जिज्ञासू नजरेत आणि मोठी स्वप्ने पाहण्याच्या आत्मविश्वासात ग्रामीण भागाच्या उज्ज्वल भविष्याची झलक दिसली.
यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या शैक्षणिक आवडी, क्रीडा, कला आणि त्यांच्या दैनंदिन अनुभवांबद्दल पालकमंत्री विखे पाटील यांना सांगितले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांतील कुतूहल पाहून ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेली अथांग क्षमता आणि प्रगतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शाळेतील शिक्षकांनीही याप्रसंगी शाळांमध्ये राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम, सध्या उपलब्ध असलेल्या सुविधा आणि भविष्यात सुधारणा करण्याच्या गरजांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा, आधुनिक शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, या मुलांमध्ये दडलेल्या प्रत्येक प्रतिभेला योग्य दिशा मिळाल्यास ते निश्चितच आपल्या राष्ट्राचे भविष्य अधिक भक्कम करतील, असे मत व्यक्त करत यासाठी शासन आणि समाज अशा सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

या आत्मीय संवादाच्या शेवटी, पालकमंत्री विखे पाटील यांनी सर्व बालमित्रांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह पठार भागातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
.
