संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या कामात महसूल प्रशासन व्यस्त असल्याचे पाहून प्रवरा नदीपात्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाळू तस्करांवर महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री सर्जिकल स्ट्राईक केला आहे. प्रशासनाचे लक्ष नसल्याचा समज करून वाळू उपसा करणाऱ्या तस्करांच्या मनसुब्यांवर पाणी फेरत पथकाने सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गौणखनिज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असून महसूल यंत्रणा या कामात व्यस्त आहे. याचाच गैरफायदा घेत तालुक्याच्या पूर्व भागातील प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांनी अवैध उपसा सुरू केला होता. वाळू तस्करांकडून सर्वसामान्यांची लूट होत असल्याच्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार संगमनेर यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथक अवैध उत्खननावर नजर ठेवून होते.
शनिवारी (दि. २९ नोव्हेंबर) रात्री ११:२० वाजण्याच्या सुमारास संगमनेर बुद्रुकचे मंडळ अधिकारी धोंडीबा बुधा भालचीम (वय ५७), सुकेवाडीचे कामगार तलाठी राजेंद्र धोंडीराम पवार आणि राजापूरचे तलाठी अरबाज इनामदार हे पथकासह गस्त घालत होते. पथक आश्वी बुद्रुक गावठाणाच्या उत्तरेस, शाळेच्या मागील बाजूस असलेल्या मांची रोड परिसरात पोहोचले असता, त्यांना एक संशयास्पद पिवळ्या रंगाचा, विना नंबरचा टिप्पर येताना दिसला.
पथकाने तत्काळ सदर टिप्पर थांबवून तपासणी केली असता, त्यात सुमारे दोन ब्रास अवैध वाळू आढळून आली. अधिकाऱ्यांनी चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता, वाळू अवैध असल्याची कबुली देण्यात आली. मात्र, पथक अधिक चौकशी करत असतानाच टिप्परमधील दोन इसमांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पोबारा केला. पथकाने त्यांचा पाठलाग केला, परंतु ते हाती लागले नाहीत.

या कारवाईत महसूल पथकाने एक पिवळ्या रंगाचा विना नंबरचा टिप्पर (चेसी क्रमांक एम.एच.टी. ८६३०३५७ सी वो ५४७७) ज्याची अंदाजे किंमत ७ लाख ५० हजार रुपये आहे आणि त्यातील २ ब्रास शासकीय वाळू (किंमत ६,४०० रुपये) असा एकूण ७ लाख ५६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेले वाहन आणि वाळू आश्वी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी धोंडीबा भालचीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांवर पर्यावरणाचा ऱ्हास करणे आणि शासकीय वाळूची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

