सप्ताहाच्या निमित्ताने राजकीय जोडे बाजूला ठेवत नेते एकाच व्यासपीठावर!
संगमनेर । झुंझार न्यूज
ब्रम्हालिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी १९ वा अखंड हरिनाम सप्ताह दाढ खुर्द येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाच्या सांगता प्रसंगी राजकीय मतभेद विसरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील गटाच्या नेत्यांची एकाच व्यासपीठावर झालेली उपस्थिती उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनासाठी आणि समारोपासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, ॲड. पोपटराव वाणी, राजहंस दूध संघाचे व्हाइस चेअरमन राजेंद्र चकोर, विक्रमराजे थोरात, सुरेशराव नागरे, भारतराव गीते, शिबलापूरचे सरपंच प्रमोद बोंद्रे यांच्यासह दाढ खुर्द व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहात दाढ खुर्द आणि आजूबाजूच्या अनेक गावांमधून भाकरी आणि आमटीचे अन्नदान करण्यात आले. दररोज हजारो भाविकांनी भाकरी, आमटी आणि लापशी या प्रसादाचा आस्वाद घेतला. सप्ताहाच्या पूर्ण कालावधीत सुमारे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली.
केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक भान जपत या सप्ताहात रक्तदान शिबीर, कृषी प्रदर्शन आणि विविध प्रदर्शने भरविण्यात आली होती. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, दाढ खुर्द गावातील नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या ३५ युवकांनी एकत्र येत सप्ताहासाठी ६१ हजार रुपयांची देणगी दिली. तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून ६१ हजार रुपये, तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. याशिवाय अनेक दानशूरांनी सढळ हाताने मदत केली. राजहंस दूध संघाच्या वतीने संपूर्ण सप्ताह काळात भाविकांसाठी फिल्टर पाण्याची सोय करण्यात आली होती.
सप्ताहात राजकीय जोडे बाहेर ठेवावे लागतात: बाळासाहेब थोरात
उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत मार्मिक भाषणात म्हणाले, “जीवनात कोणालाच सुटका नाही, सेवा करणाऱ्यांना निंदेच्या प्रक्रियेतून जावेच लागते. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’, असे समजून आपण आपले चांगले काम चालू ठेवावे. मात्र, महाराजांनी राजकारणाच्या भानगडीत पडू नये. वारकरी संप्रदायात लहान-मोठा असा भेद नसून सर्व जातीधर्माच्या संतांनी मानवता धर्म पाळला आहे.
थोरात पुढे म्हणाले, “सप्ताहाच्या ठिकाणी राजकीय जोडे बाहेर ठेवावे लागतात. परमार्थ हे पवित्र ठिकाण आहे. याच भावनेतून मी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी नारागिरी महाराज सप्ताहात फुगडी देखील खेळलो होतो.
संन्याशाची सेवा करा, पाय लावू नका: ह.भ.प. दत्तगिरी महाराज
काल्याचे कीर्तन करताना ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांनी उपस्थितांना मोलाचा उपदेश केला. ते म्हणाले, “हा सप्ताह विखे आणि थोरात यांच्या सीमेवर असून दोन्ही नेते परमार्थाला मानणारे आणि मदत करणारे आहेत.
संन्याशाच्या पायावर डोके ठेवावे, पण पाय लावू नये. सेवा केली तर कृपा आहे, मात्र पाय लावल्यास ती आग आहे, ती भस्म केल्याशिवाय राहत नाही.” यावेळी त्यांनी गुरुवर्य नारागिरी महाराजांच्या आशीर्वादाचा उल्लेख केला.