पानोडी झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील खैरे वस्तीवर शुक्रवारी एक थरारक घटना समोर आली. येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून जेरबंद करण्यात आले. मात्र, एका बिबट्याला विहिरीतून काढले जात असतानाच जवळच्या तळ्यावर दुसरा बिबट्या दिसल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

पानोडी – हजारवाडी रस्त्यावरील खैरे वस्ती येथे रखमा तान्हाजी खैरे यांचे क्षेत्र (गट नं ३३४) आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात असताना एक बिबट्या येथील विहिरीत पडला. मात्र, ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मंदा रखमा खैरे या विहिरीवर विद्युत पंप (मोटर) चालू करण्यासाठी गेल्या होत्या.

विहिरीजवळ जाताच त्यांना अचानक बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. घाबरलेल्या मंदा खैरे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना पाण्यात बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ आरडाओरडा करून पती रखमा खैरे आणि आजूबाजूच्या रहिवाशांना आवाज दिला. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.

ग्रामस्थांनी घटनेची माहिती संगमनेर वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनाधिकारी सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रामेश्वर मंडपे, भाऊसाहेब साळवे तसेच वन कर्मचारी सुकदेव सूळ, संजय गागरे, नजीर शेख, उत्तम भूसारी आणि रवि पडवळे यांचे पथक पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तर स्थानिक रावसाहेब घुगे, बाळासाहेब नागरे, पांडूरंग साबळे, बाळू सानप, कैलास नागरे, रविंद्र खंडाळे व इतर ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. साधारणतः दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीबाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. वनरक्षकांच्या अंदाजानुसार, हा बिबट्या गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विहिरीत पडला असावा, त्यामुळे तो जवळपास २४ तास पाण्यात मृत्यूशी झुंज देत होता.

तर एकीकडे विहिरीतून एका बिबट्याला बाहेर काढण्याचे काम सुरू होते, तर दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार घडला. शेजारीच असलेल्या तळ्यावर काही तरुणांना आणखी एक बिबट्या दिसून आला. या बिबट्याने तरुणांवर पाहून गुरगुरण्यास सुरुवात केल्याने एकच घबराट उडाली.

विहिरीतील बिबट्या जेरबंद झाला असला तरी, तळ्यावर दिसलेल्या दुसऱ्या बिबट्यामुळे खैरे वस्ती आणि पानोडी परिसरात दहशत कायम आहे. तळ्यावरील रस्ता हा एकमेव असून, याच मार्गावरून शाळकरी मुले शाळेत जातात. आता तिथेच बिबट्याचे वास्तव्य असल्याने मुलांच्या आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या भागात दुसरा पिंजरा लावून या मोकाट बिबट्यालाही जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *