संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यात अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच असून, सुकेवाडी येथील कारवाईची शाई वाळत नाही तोच संगमनेर शहर पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री शहरात छापा टाकत पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, यात ३२ किलो ८४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, सुमारे ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री १.४५ ते पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहराच्या गोल्डन सिटी परिसरातील केशव तीर्थ, गाळा नं. २ येथे काही इसम अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी आरोपींकडे प्लास्टिकच्या गोणीमध्ये काळपट व हिरवट रंगाचा उग्र वास येणारा सुका गांजा (कॅनाबीस वनस्पतीचे शेंडे) आढळून आला


या प्रकरणी पोलिसांनी खालील चार जणांना रंगेहाथ पकडले आहे:
१. शुभम चंद्रकांत जाधव (वय २८, रा. इंदिरानगर)
२. विशाल अशोक गायकवाड (वय २२, रा. जनतानगर)
३. प्रथमेश अशोक पावडे (वय २२, रा. इंदिरानगर)
४. परवेझ दाऊद शेख (वय २६, रा. घुलेवाडी)
या आरोपींकडून ३२.८४५ किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बुधवारी पहाटेच नाशिकच्या विशेष पथकाने संगमनेर जवळील सुकेवाडी येथे छापा टाकून सव्वा कोटी रुपयांचा तब्बल ४५६ किलो गांजा जप्त केला होता. बाहेरच्या पथकाने येऊन कारवाई केल्यानंतर स्थानिक पोलिसांना जाग आली का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरात आणि तालुक्यात पोलिसांचा हलगर्जीपणा आणि काही अंशी आर्थिक हितसंबंधांमुळे अमली पदार्थांची तस्करी फोफावल्याचा आरोप होत आहे. यामुळे तरुण पिढी आणि विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी जोर धरू लागली
संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे आणि तस्करी वाढली असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच तिन्ही पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सदर कारवाई संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *