शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांचा इशारा; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन सादर
संगमनेर । झुंझार न्यूज
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि उत्तर पुणे व नगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा पुणे-नाशिक सेमी-हाय स्पीड रेल्वे प्रकल्प सध्या मार्ग बदलामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा प्रकल्प शिर्डीमार्गे वळवण्यास स्थानिक स्तरावरून तीव्र विरोध होत असून, तो मूळ नियोजित मार्गानेच (राजगुरुनगर-आळेफाटा-साकुर-संगमनेर) करण्यात यावा, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी ‘शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’ संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देत जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

विकासाच्या दृष्टीने मूळ मार्गच महत्त्वाचा
सुमारे १० वर्षांपासून नियोजित असलेला हा प्रकल्प तळागाळातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या रेल्वेमुळे केवळ दळणवळणच नव्हे, तर शेती, शिक्षण आणि उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गासाठी बहुतांश भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. हा भाग आजवर रेल्वे संपर्कापासून वंचित राहिला असल्याने, मूळ संरेखनानुसार (Original Alignment) रेल्वे धावल्यास तो या भागाच्या विकासाचा ‘गेम चेंजर’ ठरेल, असे मत राहुल ढेंबरे पाटील यांनी व्यक्त केले आहे
पुणे-नाशिक रेल्वे मार्गात नारायणगाव जवळील जीएमआरटी (GMRT) प्रोजेक्टचा तांत्रिक अडसर येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, यावर उपाय म्हणून संपूर्ण मार्ग बदलून तो शिर्डीमार्गे वळवणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जीएमआरटी प्रकल्पाला बाधा न आणता नियोजित मार्गात केवळ १५-२० किलोमीटरचा बदल करणे अपेक्षित असताना, संपूर्ण मार्गच बदलण्याचा निर्णय घेणे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे, असे मत संघटनेने मांडले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करताना ढेंबरे पाटील म्हणाले की, “अश्विनी वैष्णव यांनी दूरसंचार मंत्री असताना दुर्गम भागातील नेटवर्क नसलेल्या गावांना जोडण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. त्याच धर्तीवर, पुणे-नाशिक रेल्वेच्या मूळ मार्गाचे महत्त्व ओळखून ते या भागातील जनतेला न्याय देतील, असा आम्हाला विश्वास आहे.





