संगमनेर । झुंझार न्यूज

राज्यभरात बिबट्यांचा मुक्त वावर आणि मानवावरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. जवळे कडलग या गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका ४ वर्षांच्या निष्पाप बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. सिद्धेश सूरज कडलग असे या मृत बालकाचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना शनिवारी (दि. १४) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. सायंकाळची वेळ असल्याने घरातील मोठी माणसे आपल्या कामात व्यस्त होती. वडील सूरज कडलग हे गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते, तर आजी डोक्यावर गवताचे ओझे घेऊन गोठ्याकडे गेली होती.

त्याच वेळी ४ वर्षांचा सिद्धेश घराच्या दारात एकटाच उभा होता. घराच्या परिसरातील गिन्नी गवतात बिबट्या आधीच दबा धरून बसला होता. सिद्धेश एकटा असल्याची संधी साधत बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की, त्यात सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सिद्धेशच्या वडिलांनी आणि आजीने एकच आक्रोश केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एका निष्पाप जीवाला बिबट्याने भक्ष्य केल्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांचा संयम सुटला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी प्रशासनासमोर आक्रमक भूमिका घेतली. “जोपर्यंत या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार केले जात नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर तरी वनविभाग जागे होऊन नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *