संगमनेर तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) दाढ खुर्द येथे केंद्राच्या २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी भव्य एक दिवसीय ‘गुरुचरित्र पारायण’ सोहळा आयोजित केला होता.
सकाळी ८ वा. भूपाळी आरती नंतर श्री गुरुचरित्र वाचनास आरंभ झाला. मोठ्या संख्येने पुरुष व महिला भाविक पारायणामध्ये सहभागी झालेले होते. सकाळपासून केंद्राच्या परिसरात रांगोळी काढून दरबार आकर्षक पद्धतीने सजविला होता. मार्गशीर्ष कृ १२ या तिथीला सन २००० साली दाढ खुर्द येथे हनुमान मंदिरात केंद्राचा प्रारंभ झाला. हळू हळू वाटचाल करत केंद्राने २५ वर्षाचा प्रवास करून भव्य-दिव्य स्वरूप प्राप्त केलेले आहे. केंद्र स्वतःच्या जागेत दिमाखात उभे राहिले आहे. वाचनासाठी स्वतंत्र सभामंडप, स्टोअररूम, प्रसाधन गृह, पाणी व्यवस्था, परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून सर्वच भौतिक बाबींची परिपूर्णता केंद्रात आहे. केंद्राने २५ वर्षात विविध उपक्रम राबवून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. अनेक तरुण युवक-युवती आज संस्कार संपन्न जीवनाची अनुभूती घेत आहे. चांगल्या ठिकाणी, चांगल्या पदावर कार्यरत आहे. केंद्रामधून सेवेबरोबरच अध्यात्मिक विकास व बालसंस्काराला विशेष महत्व दिले जाते. कारण संस्कार केले तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल या उक्तीप्रमाणे कार्य अखंडपणे सुरु आहे.
केंद्र स्थापनेला २५ वर्ष पूर्ण झाल्याने विशेष उपक्रम म्हणून एक दिवसीय गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांपासून जेष्ठांपर्यत सर्वच उत्साहाने पारायणात सहभागी झाले होते. एकूण १५४ भाविक पारायणात सहभागी झाले होते. सकाळी नाश्ता, चहा, दुपारी भोजणाची व्यवस्था केलेली होती. सेवेकरी बांधवांनी पारायणाचे उत्कृष्ट नियोजन केलेले होते.
व्यासपीठ चालक म्हणून अशोक पर्वत हे होते. सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार मानून पारायणाची सांगता झाली. पारायण यशस्वी करण्यासाठी सुनिल गाडेकर, अनिल जोशी, दत्तू पर्वत, सागर जोशी, संदीप जोशी, रोहिदास जोशी, प्रकाश जोशी, तुकाराम जोरी, अमोल पर्वत व सर्व महिला सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.