संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खरशिंदे गावातील ग्रामस्थांनी आपल्या जागृतपणाचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या रस्त्याचे काम ठेकेदाराने घाईघाईत आणि निकृष्ट दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असता, ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ते काम बंद पाडले. अखेर ग्रामस्थांच्या दबावामुळे ठेकेदाराला रस्ता पुन्हा खोदून, शास्त्रोक्त पद्धतीने मजबूत खडीकरण व मुरमीकरण करून कामास सुरुवात करावी लागली आहे.
खरशिंदे हे गाव संगमनेर तालुक्यातील पठार भागात वसलेले असून, निसर्गरम्य अशा वाटीसारख्या आकारात चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. मात्र, या निसर्गसौंदर्याला खराब रस्त्याचे ग्रहण लागले होते. गावात जाण्यासाठी घाट रस्ता असून, हा रस्ता अत्यंत वळणदार आणि अवघड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खड्डेमय झाल्याने ग्रामस्थांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होत असे.
ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर घाट ते गाव या दरम्यानच्या सुमारे १ किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी मिळाली. मंजुरी मिळून अनेक दिवस उलटले तरी काम सुरू होण्यास विलंब झाला. या विलंबाने आधीच नाराज असलेल्या ग्रामस्थांचा संताप तेव्हा अनावर झाला, जेव्हा ठेकेदाराने काम सुरू तर केले, पण ते केवळ ‘उरकून’ टाकण्याच्या उद्देशाने.जुन्याच रस्त्यावर केवळ खडी टाकून त्यावर डांबर ओतण्याचा सपाटा ठेकेदाराने लावला होता. रस्ता न खोदता, आहे त्या पृष्ठभागावर खडीकरण केल्याने रस्ता मजबूत होणार नाही, हे लक्षात येताच ग्रामस्थ एकवटले.
काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पाहताच खरशिंदे ग्रामस्थांनी एकजूट दाखवत कामाच्या ठिकाणी धाव घेतली आणि काम बंद पाडले. “आम्हाला रस्ता हवा आहे, पण तो दिखाऊ नको, तर टिकाऊ हवा,” अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला.
ग्रामस्थांनी मागणी केली की, जुना रस्ता पूर्णपणे खोदून घ्यावा, त्यावर मजबूत खडीकरण आणि मुरमीकरण करावे. त्यानंतर भरपूर पाणी मारून रोलरने रस्ता चांगला दाबून पक्का केल्याशिवाय डांबरीकरण करू देणार नाही. ग्रामस्थांचा हा आक्रमक पवित्रा आणि कामाप्रती असलेली सजगता पाहून ठेकेदाराला अखेर नमते घ्यावे लागले.
सध्या ठेकेदाराने ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्ता पुन्हा खोदून, योग्य तांत्रिक निकषांनुसार कामास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खरशिंदे ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि जागृतपणाचे कौतुक होत आहे. विकासाच्या कामात नागरिकांचा सहभाग आणि लक्ष असल्यास दर्जा कसा राखला जातो, हेच या घटनेतून दिसून येते.