संगमनेर । झुंझार न्यूज

श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे आगमन झाले असून, खांडगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने या ‘कृषिदुतां’चे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी सरपंच ॲड. विकास गुंजाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे गावात औपचारिक स्वागत केले.

कृषी शिक्षणात पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष क्षेत्रावर कामाचा अनुभव घेणे महत्त्वाचे असते. याच उद्देशाने, श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी पुढील तीन महिने खांडगाव येथे वास्तव्यास असणार आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत ते खांडगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. प्रामुख्याने शेती उत्पादनात वाढ कशी करावी, पिकांचे रोग व्यवस्थापन, माती परीक्षण, पाण्याचे नियोजन आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर व आधुनिक शेतीपद्धतींचा अवलंब याविषयावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे पारंपरिक शेतीला विज्ञानाची जोड मिळण्यास मदत होईल.

या विद्यार्थी गटामध्ये विशाल गागरे, साहिल गारे, यशराज दातीर, दर्शन देशमुख, आदित्य दुरुंदे, हरिओम दुरुंदे, ओमकार करपे आणि विवेक ढोकणे यांच्यासह अनेक विद्यार्थी असून या मार्गदर्शनातून आणि प्रात्यक्षिकांतून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी श्रीमती यु. एस. नवले, सरपंच ॲड. विकास गुंजाळ, प्रगतशील शेतकरी संदीप गुंजाळ आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed