श्रीरामपूर । झुंझार न्यूज

 

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत मोठा ‘स्ट्राइक’ दिला आहे. ‘भयमुक्त श्रीरामपूर’चा नारा देत ससाणे यांनी विरोधकांचे तगडे आव्हान मोडीत काढले. या निवडणुकीत भाजपने १० जागा जिंकत आपली घोडदौड कायम ठेवली असली, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ३ जागांसह पालिकेत आपले खाते उघडले आहे.

विरोधकांचा गोंधळ अन् ससाणेंची शिस्तबद्ध रणनीती

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे करण ससाणे यांनी अवलंबलेली रणनीती. ससाणे यांनी निवडणुकीची घोषणा होताच स्वतःची उमेदवारी जाहीर केली आणि संपूर्ण पॅनेलसह प्रचारात आघाडी घेतली. दुसरीकडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ . सुजय विखे, अविनाश आदिक आणि अनुराधा आदिक यांच्या गटात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी भाजपकडून श्रीनिवास बिहानी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, तोपर्यंत ससाणे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती. विरोधकांमधील या ‘सुंदोपसुंदी’चा मोठा फायदा काँग्रेसला झाला.

 


दिग्गजांना मतदारांनी नाकारले; पक्षांतर भोवले?

या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना धूळ चरावी लागली आहे. लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचा नगरसेवक पदाच्या निवडणुकीत झालेला पराभव हा या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्याचप्रमाणे रवींद्र गुलाटी, राजेश अलघ आणि संजय छल्लारे यांसारख्या दिग्गजांनाही मतदारांनी नाकारले. या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेले पक्षांतर मतदारांच्या पचनी पडले नसल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

 

अपक्ष अर्जुन दाभाडे यांचा ऐतिहासिक विजय

 

श्रीरामपूर पालिकेच्या इतिहासात तब्बल २९ वर्षांनंतर एका अपक्ष उमेदवाराने विजयाची मोहोर उमटवली आहे. अर्जुन दाभाडे यांनी दिग्गज उमेदवार राजेश अलघ यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १९९६ नंतर प्रथमच एखाद्या अपक्ष उमेदवाराने पालिकेत प्रवेश केला आहे.

चव्हाण दांपत्याचा दबदबा कायम

 

 

भाजपचे दीपक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वैशाली चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शहरात आपली ताकद सिद्ध केली आहे. सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा पराक्रम केल्याने शहरात त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा आहे.

शिंदे सेनेची एन्ट्री, राष्ट्रवादी ‘शून्यावर’

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली ३ जागा जिंकत पालिकेत आपले खाते उघडले. प्रकाश चित्ते यांनी शहरात मोठी हवा निर्माण केली होती, मात्र त्यांना नगराध्यक्षपदापर्यंत मजल मारता आली नाही. सर्वात मोठी पिछेहाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. विखे-आदिक युतीने मुस्लिम बहुल भागात उमेदवार दिले खरे, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती, परिणामी राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही.

 

Oplus_131072

ससाणे-कांबळे युतीची आठवण

निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना स्व. जयंत ससाणे आणि स्व. अनिल कांबळे या जोडगोळीची प्रकर्षाने आठवण झाली. ९ वर्षांपूर्वी ज्या ताकदीने या दोघांनी निवडणूक लढवली होती, त्या आठवणींनी मतदार भावूक झाले होते.

 

Oplus_131072

करण ससाणे यांनी “आरे ला कारे” न करता शांततेच्या मार्गाने आणि विकासाच्या मुद्द्यावर केलेला प्रचार मतदारांना भावला. श्रीरामपूरच्या मतदारांनी ससाणे यांच्या झोळीत भरभरून दान टाकत शहराची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *