संगमनेर-अकोले मार्गाचा समावेश असलेल्या २०१९ च्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याची विनंती
लोणी : झुंझार न्यूज
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून सध्या सुरू असलेला संभ्रम दूर करून, हा प्रकल्प २०१९ मध्ये निश्चित केलेल्या मूळ आराखड्यानुसारच (अकोले-संगमनेर मार्गे) कार्यान्वित करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव २०१९ मध्ये तयार करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार हा मार्ग नारायणगाव, संगमनेर, अकोले आणि सिन्नर असा निश्चित करण्यात आला होता. या मार्गासाठी जमिनींचे संपादन करण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावित मार्गात बदल करून अकोले तालुक्याला या प्रकल्पातून वगळण्यात आल्याचे समजते. नवीन प्रस्तावात हा मार्ग नारायणगाव, संगमनेर आणि थेट नाशिक असा दर्शवण्यात आल्याने अकोले तालुक्यातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले की, प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात बदल करताना कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. प्रशासकीय स्तरावर नक्की काय हालचाली सुरू आहेत, याची कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनाचा संदर्भही विखे पाटील यांनी दिला. नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ (JMRT) या रेडिओ टेलिस्कोप सेंटरच्या सिग्नलमध्ये रेल्वेमुळे अडथळा येऊ शकतो, असे तांत्रिक कारण केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. या तांत्रिक अडचणींवर मार्ग काढून मूळ मार्गच कसा कायम ठेवता येईल, यावर विचार होणे गरजेचे असल्याचे विखे पाटील म्हणाले.


