झरेकाठी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला असून, मानवी हल्ल्यानंतर आता बिबट्याने आपला मोर्चा पाळीव प्राण्यांकडे वळवला आहे. दोन दिवसांपूर्वी एका तरुणावर हल्ला केल्यानंतर, शुक्रवारी पहाटे बिबट्याने एका शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास, झरेकाठी येथील गट नंबर १८२ मधील रहिवासी संपत गेनू वाणी यांच्या घराजवळील गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला. हा गोठा विटांच्या बांधकामाचा असतानाही, बिबट्याने भिंतीच्या विटा बाजूला करून आत शिरकाव केला आणि एका शेळीवर हल्ला करून तिला जखमी केले.


शेळ्यांचा आरडाओरडा ऐकून संपत वाणी यांच्या पत्नी लता वाणी यांना जाग आली. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने गोठ्याकडे धाव घेतली आणि आरडाओरडा सुरू केला. लता वाणी यांचा धाडसी अवतार पाहून बिबट्याने तेथून पळ काढला, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली आहे.


या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच झरेकाठी येथील संदीप वाणी हे आपल्या मोटरसायकलवरून गावकडून घराकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यातून संदीप वाणी थोडक्यात बचावले होते. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे सावट पसरले होते.


संदीप वाणी यांच्यावरील हल्ल्यानंतर वनविभागाने तातडीने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा पिंजरा वस्तीपासून बराच दूर अंतरावर लावण्यात आला आहे. बिबट्याचा वावर वस्तीच्या अगदी जवळ असूनही पिंजरा लांब असल्याने बिबट्या त्यात अडकत नाहीये. उलट बिबट्या वस्तीतील पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत आहे.


“बिबट्याने परिसरात दहशत माजवली आहे. वनविभागाने लावलेला पिंजरा योग्य ठिकाणी नसल्याने बिबट्या जेरबंद होत नाहीये. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि पिंजरा वस्तीजवळ हलवावा,” अशी मागणी झरेकाठी येथील जनसेवा युवा मंचचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी केली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *