राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करून, बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील गणेश मारुती डेंगळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश डेंगळे याने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून मंत्री विखे पाटील यांच्या संदर्भात समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल, असा बनावट व्हिडिओ शेअर केला होता. मंत्र्यांच्या चारित्र्याला हानी पोहोचवणे आणि राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हा प्रकार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लोणी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल नानासाहेब विखे यांनी याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न? तक्रारीनुसार, मंत्री विखे पाटील यांच्या राजकीय विरोधकांशी संगनमत करून हा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला होता. विखे पाटील समर्थक आणि विरोधक यांच्यात वादाची ठिणगी टाकणे, तसेच दोन समाजांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करून शांतता भंग करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. या पोस्टमधील सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
लोणी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गणेश डेंगळे याच्यावर २४ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील नवीन कलमांनुसार (कलम ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३५३, ३५३(२), ३५६, ३५१ आणि ३५२) हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस निरिक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
राजकीय नेत्यांची बदनामी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा (AI किंवा मॉर्फिंग) चुकीचा वापर करणाऱ्यांविरुद्ध आता पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.