झरेकाठी । झुंझार न्यूज

भक्ती, संस्कृती आणि संस्कारांची अखंड परंपरा जपत, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित “वारी पंढरीची… ज्ञानगंगा प्रवरेची” हा अभिनव उपक्रम यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या विविध शैक्षणिक संकुलांमधील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी गावोगावी पायी दिंडी काढून विठ्ठल भक्तीचा जागर केला. टाळ-मृदुंगाचा गजर आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण प्रवरा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.


दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जि प माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायातील समतेचा संदेश मिळावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

Oplus_131072

दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. “कपाळी केशरी गंध, देवा मला तुझा छंद”, “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा आणि संत जनाबाई यांची वेशभूषा साकारली होती. हातांत भगव्या पताका, तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी आणि टाळ-मृदुंग वाजवणारे विद्यार्थी यामुळे प्रत्यक्ष पंढरीची वारीच प्रवरेच्या दारात आल्याचा भास ग्रामस्थांना होत होता.

Oplus_131072

लोणी बुद्रुक येथे प्रवरा कन्या विद्यामंदिर, अहिल्याबाई होळकर विद्यालय आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी भव्य दिंडी काढली. या दिंडीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध होते. पालखीचे पूजन अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. सुस्मिता विखे पाटील, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्राचार्या विद्या घोरपडे, रेणू पाटील आणि मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

Oplus_131072

दिंडीचा मार्ग विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले. दिंडीनंतर राम मंदिर प्रांगणात विद्यार्थ्यांनी पावली, भारूड, अभंग आणि विठ्ठल भक्तीचा महिमा सांगणाऱ्या नाटिका सादर केल्या. रिमझिम पाऊस आणि आल्हाददायक वातावरणामुळे या सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.

Oplus_131072

गावोगावी घुमला विठ्ठल नामाचा गजर

संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये या दिंडीचे आयोजन केले होते. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही ‘गावची वारी’ एक अविस्मरणीय सोहळा ठरली.

Oplus_131072

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण देण्यावर आमचा भर आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही ‘ज्ञानगंगा’ विद्यार्थ्यांपर्यंत आपली संस्कृती पोहोचवण्याचे काम करत आहे. यंदा ४० हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून वारीची परंपरा गावागावात पोहोचवली, हे या उपक्रमाचे मोठे यश आहे.

 

– डॉ. सुस्मिता विखे पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था)

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *