लोणी : झुंझार न्यूज 

सहकार आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरा परिसरात आज एका नव्या पर्वाचा उदय झाला आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या डोळ्यांत शिक्षणाचे स्वप्न पेरले. तोच वारसा अधिक सक्षमपणे, आधुनिकतेची जोड देत पुढे नेण्याचे काम प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिताताई विखे पाटील (माई) करत आहेत. ‘शिस्तीच्या कडक पण अंतःकरणाने हळव्या’ अशा त्यांच्या प्रतिमेमुळे त्या आज केवळ प्रशासक राहिल्या नसून विद्यार्थ्यांच्या ‘माई’ झाल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अष्टपैलू कार्याचा घेतलेला हा आढावा…

 

शिक्षणाचे आधुनिक ‘व्हिजन’

डॉ. सुस्मिताताईंचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दूरदृष्टी. प्रवरेचा विद्यार्थी केवळ पदवीधर होऊ नये, तर तो जागतिक स्पर्धेत टिकणारा ‘सर्वगुणसंपन्न’ नागरिक व्हावा, हे त्यांचे ध्येय आहे. महसूल व जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुस्मिताताईंनी संस्थेत कायापालट घडवून आणला आहे.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी मुंबई-पुण्याला जाण्याची गरज उरली नाही. त्यांच्या संकल्पनेतून संस्थेतच सीईटी, नीट (NEET) आणि जेईई (JEE) च्या तयारीसाठी विशेष अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली आहेत. ‘क्वालिटी एज्युकेशन’वर भर देताना त्यांनी तज्ज्ञांच्या मदतीने ‘प्रवरा’ची स्वतःची पुस्तके तयार करून घेतली असून, शिक्षकांसाठी विशेष ट्रेनिंग प्रोग्राम राबवले आहेत.

 

शेती आणि तंत्रज्ञानाची सांगड

शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीकडे हीन भावनेने न पाहता ‘व्यावसायिक’ दृष्टीने पाहावे, यासाठी त्यांनी कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग राबवले. कमी जागेत जास्त उत्पादन आणि त्याचे मार्केटिंग कसे करावे, याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांमध्येही कृषी व्यवसायाबद्दल नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

विश्वविक्रमी उपक्रम आणि सांस्कृतिक जतन

डॉ. सुस्मिताताईंच्या नेतृत्वाखाली प्रवरेने अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. जून महिन्यात आयोजित ‘वारी’ उपक्रमात ३० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एक नवा इतिहास रचला. तसेच, ‘सहकारातून समृद्धीकडे’ या संकल्पनेतून डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला. ५ हजार विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा, लेझीम आणि लाठीकाठी पथक ही संस्कृती रक्षणाची एक मोठी चळवळ ठरली. नवरात्र उत्सवात ‘नवदुर्गा’ म्हणून स्थानिक कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान रुजवला.

 ।
विद्यार्थी आता ‘नोकरी मागणारे’ नव्हे, तर ‘देणारे’ होतील

‘प्रवरा बिझनेस एक्स्पो’ आणि ‘प्रवरा बिल्डिंग’ सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी जवळपास २ कोटींची उलाढाल केली. ग्रामीण भागातील मुलांमध्येही उद्योजकतेचे गुण असतात, हे सुस्मिताताईंनी जगाला दाखवून दिले. ‘प्रिझम स्टार्ट अप’ आणि ‘इस्रो’ सोबतचे संशोधन करार यातून प्रवरेचा विद्यार्थी आता अंतराळ संशोधनापासून ते स्वयंचलित उद्योगापर्यंत मजल मारत आहे.

कल्याणकारी उपक्रम: सेंट्रलाईज किचन व स्पोर्ट्स अकॅडमी

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून त्यांनी ‘सेंट्रलाईज किचन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६,५०० मुलांचे जेवण एकाच ठिकाणाहून दर्जेदार पद्धतीने बनवले जाते. खेळाडू घडवण्यासाठी ‘प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी’ची स्थापना केली, ज्यातून आज राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत आहेत. आगामी १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणारी ‘प्रवरा फाउंडेशन अकॅडमी’ ही ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत मैलाचा दगड ठरेल.


प्रसिद्धीपासून दूर, कर्तृत्वावर भर

डॉ. सुस्मिताताईंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या कधीही प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत नाहीत. प्रसिद्धीच्या मागे न लागता आपल्या बुद्धीने आणि कष्टाने त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळवली आणि संस्थेचा गाडा हाकण्यात स्वतःला वाहून घेतले. एक उत्तम टीम लीडर म्हणून त्या सहकाऱ्यांना सोबत घेतात, पण कामाच्या बाबतीत तडजोड करत नाहीत.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा परिवारात आनंदाचे वातावरण आहे. भविष्यातील सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील एक खंबीर महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी वाट निर्माण करणाऱ्या डॉ. सुस्मिताताई विखे पाटील यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!

 

यमन पुलाटे लोणी

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *