२५० ते ३०० महिलांच्या श्रमदानातून भाकरीचा महाप्रसाद; ‘नारीशक्तीचा सन्मान’ सोहळ्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद

आश्वी : झुंझार न्यूज 

श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान, दाढ बुद्रुक (ता. राहाता) यांच्या वतीने आयोजित ‘श्री साई सच्चरित पारायण’ आणि ‘सन्मान नारीशक्तीचा’ या संकल्पनेवर आधारित भव्य संगीतमय ‘देवी भागवत कथा’ निरुपण सोहळा सध्या भक्तीमय वातावरणात सुरू आहे. ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे यांच्या सुमधूर आणि रसाळ वाणीतून या कथेचे चौथे पुष्प काल गुंफण्यात आले. जीवाचे परम कल्याण करणारी आणि साधकाला भक्तीसुखात न्हाऊ घालणारी ही कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील नारीशक्तीचा सहभाग. दिवसभर घरकाम आटोपून सायंकाळी महाप्रसादासाठी सुमारे २५० ते ३०० महिला स्वतःहून उपस्थित राहतात आणि श्रद्धेने भाकरी बनवण्याचे काम करतात. साध्वी सोनालीताई करपे यांनी या महिलांचे विशेष कौतुक केले. “भाकरी बनवण्यामागचा त्यांचा शुद्ध आणि निस्वार्थी भाव पाहून पंगतीत साक्षात देव सुद्धा प्रसाद घेण्यास येत असतील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘जिथे नारीचा सन्मान होतो, तिथे देवत्व आणि सुसंस्कार रुजतात,’ असे त्यांनी सांगितले .

जीवनाचे सार्थक करण्यासाठी १२ प्रकारचे दान आवश्यक
कथा निरुपणादरम्यान साध्वी सोनालीताईंनी मानवी जन्माचे महत्त्व पटवून दिले. “देवाने आपल्याला दिलेली इंद्रिये ही केवळ उपभोगासाठी नसून देश, देव आणि धर्मसेवेसाठी आहेत, तर मानवी जीवनात सुवर्णदान, अन्नदान, भूदान, जलदान, वस्त्रदान, औषधीदान, अभयदान, रक्तदान, सेवादान, कन्यादान, गोदान आणि विद्यादान या १२ प्रकारच्या दानांचे महत्त्व सांगत पुढील पिढी सुसंस्कृत घडवण्यासाठी अध्यात्माची जोड असणे काळाची गरज आहे .

 

कथेचा समारोप आरतीने झाल्यानंतर सुमारे ३ हजार भाविकांनी आमटी-भाकरी आणि भाताच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी अन्नपूर्णा रवी आण्णा बनसोडे आणि गणेश बनसोडे परिश्रम घेत आहेत. गावातील तरुण मुलांनी आणि विविध ग्रुपच्या सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाढण्याची जबाबदारी पार पाडली. पंगतीनंतरची स्वच्छता गणेश आरणे आणि दिनेश आरणे यांनी केली.


गेल्या १७ वर्षांपासून श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पवित्र पौष महिन्यात भगवतीचे चरित्र ऐकण्याची संधी मिळणे हे दाढ ग्रामस्थांचे मोठे भाग्य असल्याचे बोलले जात आहे.


या सोहळ्याचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश तांबे पाटील यांच्यासह सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *