नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या पदभार स्वीकार सोहळा !
राहाता । झुंझार न्यूज
राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्यासह नूतन नगरसेवकांचा पदभार स्वीकार सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
राहाता नगरपरिषदेवर महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आज सत्ताग्रहणाचा अधिकृत कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना नामदार विखे पाटील म्हणाले की, “हा विजय जनतेने महायुतीच्या कामावर दाखवलेला विश्वास आहे. शहराच्या निवडणुकीत आपण नागरिकांना जी आश्वासने दिली आहेत, त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. विकासाची ही प्रक्रिया केवळ कागदावर न राहता ती प्रभावीपणे जमिनीवर उतरवण्यासाठी सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींनी हेवेदावे विसरून एकजुटीने काम करावे.
पालकमंत्र्यांनी नवनिर्वाचित मंडळाकडून अपेक्षा व्यक्त करताना सांगितले की, राहाता शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मूलभूत सुविधांवर भर देणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने नियमित पाणीपुरवठा, सांडपाण्याची विल्हेवाट, स्वच्छता मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी आणि दर्जेदार रस्ते या नागरी सुविधांना प्राधान्य दिले जावे. प्रशासनाचा कारभार हा पूर्णपणे ‘लोकाभिमुख’ असावा, जेणेकरून सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सुटतील, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
या सोहळ्याला ह.भ.प. उद्धव महाराज मंडलीक यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लोंढे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राहाता शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी यावेळी बोलताना, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढू आणि राहाता शहराला एक मॉडेल शहर बनवू, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी मोठ्या जल्लोषात नूतन नगरसेवकांनी आपल्या कक्षात प्रवेश करून कामकाजाला सुरुवात केली. या विजयामुळे राहाता शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.