शेतकरी मेळावा; जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
आश्वी । झुंझार न्यूज
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिंपरणे गाव सध्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू (अड्डा) ठरत असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यानंतर आता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला मिळालेल्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीमुळे तालुक्यात थोरातांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
विकासाच्या मुद्द्यावरून थोरातांचा विरोधकांवर प्रहार
संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरणे येथे शेतकरी मेळावा आणि नगरपालिकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. “गेल्या ४० वर्षांत आपण काय केले, हे विचारणाऱ्यांनी आधी आपण काय दिवे लावले हे सांगावे,” अशा शब्दांत त्यांनी विखे गटावर निशाणा साधला. निळवंडे धरण, कालवे, ऑनलाईन सातबारा आणि शिक्षणाचा अधिकार यांसारखी ऐतिहासिक कामे आपण केली असून, ज्यांचे यात काहीच योगदान नाही, ते आज ‘जलदूत’ बनून फिरत असल्याची टीका त्यांनी केली.

तालुक्यात अलीकडच्या काळात वाढलेली वाळू तस्करी, अमली पदार्थांची विक्री आणि गुंडगिरी यावर थोरातांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “बेकायदेशीर टोल नाके आणि हप्तेखोरीमुळे तरुणांची पिढी उद्ध्वस्त केली जात आहे. कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकून दहशत निर्माण केली जात आहे, परंतु आम्ही ही दहशत मोडून काढू,” असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला.
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग संगमनेरवरून नेण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला, मात्र गेल्या एका वर्षात या रेल्वेची दिशा बदलण्याचे पाप कोणी केले? असा सवाल करत थोरातांनी रेल्वे मार्गाच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरले. अकोले आणि संगमनेरमध्ये भांडणे लावण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, संगमनेर तालुका हा सहकाराची पंढरी असून विकासाचे मॉडेल आहे. मागील 40 वर्षात हा तालुका बाळासाहेब थोरात साहेब यांनी उभा केला आहे. मात्र मागील एक वर्षांमध्ये तालुक्याचे नाव घालवण्याचे काम नवीन लोकप्रतिनिधी करत आहे. तालुक्याचा स्वाभिमान व अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहा असे आवाहन त्यांनी केले.
![]()
यावेळी युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. “नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेले यश ही आपल्या एकजुटीची पावती आहे. साहेबांनी दिलेला लोकसेवेचा वारसा ही केवळ परंपरा नसून ती आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू,” असे त्या म्हणाल्या.
पिंपरणे आणि अंभोरे परिसर हा पारंपरिकपणे थोरात समर्थक मानला जातो. मात्र, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विखे गटाने या भागात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला उत्तर म्हणून थोरातांनी पिंपरण्यात ही विराट सभा घेऊन आपले वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले आहे. या मेळाव्याला झालेली १० ते १५ हजार नागरिकांची गर्दी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत थोरातांसाठी पोषक वातावरण असल्याचे संकेत देत आहे.
या कार्यक्रमास संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, सुधाकर रोहम, पांडुरंग पा. घुले, शंकरराव खेमनर, गणपतराव सांगळे, अजय फटांगरे, बाबा ओहोळ यांच्यासह संगमनेर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पिंपरण्यातील हा मेळावा केवळ शेतकरी मेळावा नसून ते एक राजकीय शक्तिप्रदर्शन होते. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी थोरातांनी आपल्या बालेकिल्ल्यात विरोधकांना ‘चेकमेट’ दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.


