संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत तीन विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावत थेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

पळसखेडे शाळेतील श्रेया ज्ञानेश्वर लहरे हिने बालगटातील हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या सुवाच्च व वळणदार लेखनकौशल्याने परीक्षकांची प्रशंसा मिळवली. स्वरा योगेश गोर्डे हिने किशोर गटातील वेशभूषा सादरीकरणात महाराणी ताराराणी यांची प्रभावी भूमिका साकारत प्रथम क्रमांक पटकावला. तर अक्षदा दिपक पवार हिने कुमार गटातील वक्तृत्व स्पर्धेत “पाणी अडवा, पाणी जिरवा” या विषयावर अभ्यासपूर्ण व प्रभावी मांडणी करत प्रथम क्रमांक मिळवला.


याशिवाय किलबिल गटातील वक्तृत्व स्पर्धेत श्रद्धा शरद जोंधळे हिने द्वितीय क्रमांक, बालगटातील गोष्ट सादरीकरण स्पर्धेत विद्या गोरक्ष म्हस्के हिने द्वितीय क्रमांक, तर किशोर गटातील हस्ताक्षर स्पर्धेत समृद्धी इंद्रभान लहरे हिने तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.


या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक भारत काळे तसेच शिक्षक केशव घुगे, संपत दरेकर, सुभाष बुळे, कमल सावंत, सुरेखा आंधळे व अर्चना भालेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, विस्तार अधिकारी कल्याण राऊत, केंद्रप्रमुख कल्पना बिडवे, पळसखेडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *