आश्वी । झुंझार न्यूज
.
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक भवानराव थोरात होते. यावेळी विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच गणपत हजारे, माजी उपसरपंच विनायकराव थोरात, माजी मुख्याध्यापक मदनलाल गांधी, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, सूर्यभान थोरात, रामनाथ पवार, भारत शेवाळे, राजेश गायकवाड, मारुती सूळ, विठ्ठल घोडेकर, जाधव आदींसह मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक पोपट सोनवणे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “आज सर्व शाळांमध्ये सारखेच शिक्षण मिळते, परंतु सध्या पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाचे मोठे आकर्षण (फॅड) निर्माण झाले आहे. मात्र, आपले पाल्य गुणवान असून त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी पालकांनी केवळ घरीच नव्हे, तर शाळेतही सातत्याने येऊन शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे.” शाळेच्या क्रीडा यशाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ४ बक्षिसे मिळविली असून ही बाब शाळेसाठी अत्यंत भूषणावह आहे.
या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी दात्यांनी दिलेल्या निधीचा विनियोग कशा प्रकारे केला जातो, याची माहिती यावेळी देण्यात आली. भवानराव थोरात यांनी १ लाख २५ हजार रुपये, भिमाशंकर नागरे यांनी ५० हजार रुपये आणि इतर देणगीदारांनी ७३ हजार ३८० रुपये अशा एकूण ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या पैशातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात. हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श असल्याचे सांगण्यात आला .

छत्रपती संभाजी महाराजांवरील व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संगमनेर येथील आश्रम शाळेचा विद्यार्थी कुमार कृष्णा दिघे यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर तब्बल एक तास ओघवते आणि प्रेरणादायी व्याख्यान दिले. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे विचार आत्मसात करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.त्याच्या अमोघ वाणीतून पालक आणि विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात भवानराव थोरात यांनी शाळेच्या स्थापनेपासूनच्या जुन्या इतिहासाला उजाळा दिला. शाळा उभी करताना आलेले अनुभव आणि गावकऱ्यांचे सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्दीच्या जोरावर मोठ्या पदावर पोहोचावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले तर आभार विनायकराव थोरात यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


