संगमनेर तालुक्यात ‘प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवरांनी वाहिली आदरांजली
गावोगावी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
संगमनेर । झुंझार न्यूज
.
“वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेले योगदान आणि त्यानंतर सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात समृद्धी आणणारे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी आहे. निष्ठा, शिस्त, काटकसर आणि पारदर्शक कारभार या चतुःसूत्रीच्या जोरावर त्यांनी उभे केलेले सहकार क्षेत्र आज देशाला दिशा देणारे ठरले आहे,” असे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यात १२ जानेवारी हा दिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ‘प्रेरणास्थळ’ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

तत्त्वांची जपणूक आणि समाजहिताचा ध्यास
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर आपल्या तत्त्वांची जपणूक केली. त्यांच्यासाठी राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे माध्यम होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि इंदिरा गांधी यांच्या विचारांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी सुरू केलेले ‘दंडकारण्य अभियान’ ही राज्यासाठी पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ ठरली आहे. त्यांच्याच आदर्शावर संगमनेरचा सहकार आज देशात अग्रगण्य ठरला आहे.

सहकारातील ‘संत’ व्यक्तिमत्व: डॉ. सुधीर तांबे
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भाऊसाहेब थोरात यांचा उल्लेख ‘सहकारातील संत’ असा केला. ते म्हणाले की, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. तत्त्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या या महामानवाचा विचारांचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात समर्थपणे पुढे नेत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रासाठी संगमनेरचा सहकार ‘मॉडेल‘
सोलापूर येथील मंगल उद्योग समूहाचे सतीशचंद्र देशमुख यांनी संगमनेरच्या सहकार मॉडेलचे कौतुक केले. भाऊसाहेब थोरात यांची शिस्त आणि काटकसर जर संपूर्ण राज्याने स्वीकारली, तर सहकार क्षेत्रातून मोठी समृद्धी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, बाबा ओहोळ, डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सतीशचंद्र देशमुख (सोलापूर), महेश देशमुख, ऋतुजा देशमुख (पंजाब महिला सेवा दल प्रदेशाध्यक्ष), अजय फटांगरे, रामहरी कातोरे, रामदास वाघ, प्राचार्य केशवराव जाधव, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पांडुरंग पाटील घुले यांनी मानले.
गावोगावी उत्साहाचे वातावरण: विविध उपक्रमांची रेलचेलसंगमनेर तालुक्यातील १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांवर ‘प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुक्यात
प्रभात फेरी व स्वच्छता अभियान: गावोगावी स्वच्छता करण्यात आली.
आरोग्य व रक्तदान शिबिर: गरजू रुग्णांसाठी आरोग्य तपासणी आणि मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यात आले.
स्पर्धांचे आयोजन: विद्यार्थ्यांसाठी वकृत्व आणि निबंध स्पर्धा, तर तरुणांसाठी क्रीडा स्पर्धा व ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रिकेट स्पर्धा’ पार पडल्या.
कृषी प्रदर्शन: शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारी कृषी प्रदर्शने भरवण्यात आली होती.
तालुक्यातील सर्व सहकारी संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
Post Views: 618


