संगमनेर । झुंझार न्यूज 

सहकार चळवळीचे आधारस्तंभ आणि संगमनेरच्या विकासाचे शिल्पकार सहकारमहर्षी तीर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांची आज १०२ वी जयंती. या निमित्ताने त्यांच्या जीवनातील अनेक पैलू आणि आठवणींना त्यांचे निकटवर्तीय उजाळा देत आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे सोशल मीडिया समन्वयक विशाल काळे यांनी दादांसोबतच्या आपल्या पहिल्या भेटीचा आणि त्यांच्यातील विलक्षण माणुसकीचा एक हृद्य प्रसंग शब्दबद्ध केला आहे.

 

विशाल काळे सांगतात की, २००६ साली ते विद्यार्थी असताना ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्या’च्या अतिथीगृहामध्ये रात्रपाळीत काम करत होते. कामावर रुजू होऊन केवळ १०-१२ दिवस झाले असतानाच, ड्युटीच्या बदलामुळे त्यांना सलग रात्रपाळी आणि दिवसपाळी करावी लागली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या ‘अॅम्बेसिडर’ गाडीतून एका करारी व्यक्तिमत्त्वाचे आगमन झाले. ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भाऊसाहेब थोरात (दादा) होते.

 

अतिथीगृहात प्रवेश करताना समोरच माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचा भव्य फोटो होता. दादांनी त्या प्रतिमेला वंदन केले आणि आपल्या काठीचा आधार घेत हळूहळू कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्या भेटीसाठी पठार आणि डोंगराळ भागातील निष्ठावंत कार्यकर्ते आले होते. दादांची शिस्त कडक असली तरी त्यांच्या मनात सामान्य कार्यकर्त्यांबद्दल असलेली ओढ त्या दिवशी विशाल काळे यांना अनुभवायला मिळाली.

 

विशाल काळे जेव्हा पहिल्यांदा दादांच्या समोर गेले, तेव्हा ते प्रचंड घाबरलेले होते. मात्र, दादांनी त्यांच्या मनातील भीती ओळखून त्यांना जवळ बोलावले. “कुठला आहेस?” असे विचारल्यावर जेव्हा विशाल यांनी ‘काकडवाडी’ (तळेगाव दुष्काळी पट्टा) असे सांगितले, तेव्हा दादांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. “चांगले काम कर,” असे म्हणत त्यांनी एका नव्या कर्मचाऱ्याला आपलंसं केलं.

 

या आठवणीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दादांची सूक्ष्म दृष्टी. विशाल काळे नवीन आहेत आणि एकटेच काम करत आहेत हे ओळखून दादांनी त्यांना थेट चहा बनवण्याच्या धांदलीत टाकले नाही. त्याऐवजी, “एका वाटीत साखर घेऊन ये आणि सर्व कार्यकर्त्यांच्या हातावर थोडी-थोडी साखर दे,” असे सांगितले. या कृतीमागचा उद्देश हाच होता की, त्या नव्या मुलाला वातावरणाशी जुळवून घेता यावे.

 

“दादा कडक शिस्तीचे होते, पण त्यांच्या काळजात सर्वसामान्यांबद्दल अपार माया होती,” अशा भावना विशाल काळे यांनी व्यक्त केल्या आहेत. अतिथीगृहातील तो फोन, दादांचा संवाद आणि त्यांनी दिलेली कामाची शिस्त आजही अनेकांच्या स्मरणात जिवंत आहे.

 

आज १०२ व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यासह संपूर्ण सहकार क्षेत्रातून तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आजही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पुढे सुरू आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *