पुणतांबा परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार : ना . विखे पाटील

७६ एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प आणि ९ कोटींच्या विकासकामांचे ना. विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

 स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार

 

 

शिर्डी । झुंझार न्यूज

 

 


दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी गोदावरी धरण समूहात अतिरिक्त पाणी साठा निर्माण करण्यास राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. पुणतांबा व परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी येथील जुन्या के.टी. वेअरचे आधुनिक ‘व्हर्टिकल बॅरेज’मध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असून, यामुळे पाणी साठ्यात २० टक्क्यांनी वाढ होईल. या कामासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल,” अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 

 

 

 

 

पुणतांबा (ता. राहता) येथे सुमारे ९ कोटी रुपये निधीतून साकारलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ना. विखे पाटील बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळणार


शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणतांबा परिसरात ७६ एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असल्याची माहिती ना. विखे पाटील यांनी दिली. या प्रकल्पामुळे पुणतांबा, नपावाडी, रामपूरवाडी आणि पिंपळवाडी या गावांतील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. तसेच, ‘राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने’अंतर्गत यावेळी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक कृषी अवजारांचे वाटपही करण्यात आले.

 

 

 

९० हजार कोटींचा जलक्रांती प्रकल्प


जलसंपदा विभागाच्या योजनांची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले की, “गोदावरी कालव्यांच्या १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच नूतनीकरणासाठी ४०० कोटींचा निधी दिला आहे. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे ८५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी ९० हजार कोटींचा प्रकल्प हाती घेतला जात आहे. यातून जायकवाडीसाठी ५५ टीएमसी, भंडारदरा १५-२० टीएमसी आणि मुळा धरणासाठी १५ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. यामुळे नगर जिल्ह्यासह संपूर्ण भाग दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल.”

 

 

 

रोजगाराची मोठी संधी: शिर्डीत ‘डिफेन्स हब’ व ‘एव्हिएशन फ्युएल’ प्रकल्प


औद्योगिक विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शिर्डी औद्योगिक वसाहतीत आता संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे ‘हब’ विकसित होत आहे. निबे समूह आणि टाटा समूहाच्या २०० कोटींच्या प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. तसेच हरेगाव येथे १७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ प्रकल्प उभा राहत असून, त्यातून १० हजार रोजगार निर्माण होतील. शिर्डी विमानतळ विस्तारीकरण आणि एमआरओ सेंटरमुळे आणखी ५ हजार तरुणांना रोजगार मिळेल.

 

 

 

गावागावात सैनिकांची स्मारके उभारावीत


“छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक पुणतांबा येथे उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असून जागेचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले आहेत,” असे ना. विखे पाटील यांनी नमूद केले. सातारा जिल्ह्यातील ‘मिलिटरी अपशिंगे’ आणि नगरमधील घोसपुरी गावाचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात सैनिकांच्या सन्मानार्थ स्मारके उभारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.

 

 

 

पुणतांबा येथील गावठाण विस्तार, पाणीपुरवठा योजना आणि घरकुल प्रकल्पांसाठी २२ एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, सर्व विकासकामे दर्जेदार करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, दत्तू धोजे, डॉ. धनंजयराव धनवटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed