‘खड्डे वाचवा आणि पुन्हा खड्यात जा’ अशी दयनीय अवस्था निर्माण झाली
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि दोन्ही आश्वी गावांना जोडणाऱ्या पुलावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अखेर प्रशासनाच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा लोकसहभागातून बदल घडवण्याचा निर्धार करत, आश्वीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी एकत्र येत स्वखर्चाने हे खड्डे बुजवले आहेत.
‘खड्डे वाचवा आणि पुन्हा खड्यात जा’
गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पुलावर इतके असंख्य खड्डे पडले होते की, वाहन चालवताना ‘खड्डा वाचवावा की स्वतःचा जीव’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सायकल, मोटारसायकलसह छोट्या-मोठ्या गाड्या चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती. या खड्ड्यांमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त होत होता.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अपघात वाढल्याचे पाहून, गावातील काही उत्साही युवकांनी एकत्र येऊन पुढाकार घेण्याचे ठरवले. सरकारी निधीची वाट न पाहता, या युवकांनी तातडीने वाळू आणि सिमेंटची व्यवस्था केली. पुलावरील धोकादायक खड्डे या तरुणांनी स्वहस्ते श्रमदान करून भरले आहेत. यामुळे आता वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला असून तरुणांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड आणि कृष्ण भूषण उद्योग समूहाचे अध्यक्ष मोहित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सागर रातडिया, वैभव भंडारी, रमजान शेख , ज्ञानेश्वर पांडे, बाळासाहेब शिंदे, मनोज भंडारी, सुधीर सातपुते, गौरव मुन्तोंडे, तौफिक सय्यद, निलेश भवर, ताज्योउद्दीन सय्यद, गणेश गोयल, विशाल शिरतार, राहुल जेडगुले, बाबा भोसले यांसह अनेक तरुण उपस्थित होते.
तरुणांनी हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरले असले, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. जर भविष्यात पुन्हा अशीच स्थिती निर्माण झाली, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.