मालपाणी नगर येथे 500 महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ संपन्न
संगमनेर । झुंझार न्यूज
संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिला नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.चांगला आहार, विश्रांती हे अत्यंत गरजेचे असून विविध ठिकाणी होणाऱ्या हळदीकुंकू समारंभातून महिला मोठ्या संख्येने एकत्र येतात अशा समारंभातून महिलांच्या आरोग्याबाबत जाणीव जागृती व्हावी असे प्रतिपादन एकविराच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
मालपाणी नगर येथील गणेश मंदिरात आयोजित हळदी कुंकू समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेविका सौ.रचना मालपाणी, मार्केट कमिटीच्या संचालिका सौ.दिपाली वर्पे यांच्यासह विविध महिला पदाधिकारी यांच्यासह परिसरातील सुमारे 500 महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिला भगिनींना स्थानिक महिला मंडळाच्या वतीने विविध वाण देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, हळदी कुंकवाच्या निमित्ताने विविध गावांमधून आणि शहरांमध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येने एकत्र येतात एकमेकींच्या सुख दुःखा विषयी बोलतात. ही चांगली परंपरा आहे. त्या निमित्ताने विचारांची देवाण – घेवाण होते. या निमित्ताने सर्व महिला भगिनींनी आरोग्य विषयी चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणारी महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही हे सत्य आहे. वेळेचं व्यवस्थापन त्यांच्याकडून होत नाही आणि त्यामुळे कामाच्या धावपळीमध्ये त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कालांतराने आजार बळवतात आणि मग कुटुंबाला अडचण तयार होते म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या याचबरोबर अशा समारंभांमधून एकल महिलांना सुद्धा सहभागी करून घ्या असे आवाहन त्यांनी केले.
तर सौ.रचना मालपाणी म्हणाल्या की, मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला भगिनींचा हळदीकुंकू हा अत्यंत आवडीचा समारंभ असतो. त्या निमित्ताने वेळ काढून आपण एकमेकींच्या घरी जातो. आपलेपणाने चौकशी करतो. किंबहुना यामुळे दोन परिवारांमध्ये नाते अधिक वृद्धिंगत होते. अशा उपक्रमांमधून समाजातील विविध समस्यांवर चर्चा होऊन चांगले उपक्रम राबवण्यासाठी महिलांना सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.दिपाली वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन सौ.मनीषा गव्हाणे यांनी केले तर सौ.वृषाली खैरनार यांनी आभार मानले. यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उखाणे, गाण्यांच्या भेंड्या, संगीत खुर्ची यामध्ये महिला भगिनी रमून गेल्या.
