🎈झरेकाठी, दाढ खुर्द आणि आश्वी खुर्द येथे ग्रामस्थांशी संवाद

🔷स्थानिक प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन

 

शिर्डी । झुंझार न्यूज

 

आजचा युवक हा उद्याच्या समर्थ भारताचा कणा आहे. जर युवक सक्षम आणि स्वावलंबी झाला, तरच गाव, तालुका आणि पर्यायाने देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल. म्हणूनच शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून देणे आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे, हा माझा केवळ कार्यक्रम नसून ते माझे प्रथम प्राधान्य आहे, असा ठाम निर्धार राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क दौऱ्यांतर्गत ना. विखे पाटील यांनी झरेकाठी, दाढ खुर्द आणि आश्वी खुर्द या गावांना भेटी दिल्या. यावेळी आयोजित ‘ग्राम संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज समस्या, शेती, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर स्थानिक ग्रामस्थांशी थेट आणि मनमोकळा संवाद साधला.

ग्रामस्थांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर आपला भर आहे. केंद्र सरकारही युवकांच्या भवितव्यासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीने सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि स्वयंरोजगारासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

दौऱ्यादरम्यान नागरिकांनी प्रामुख्याने शेतीसाठीची वीज, गावांतर्गत रस्ते आणि आरोग्य सुविधांमधील त्रुटींबाबत ना. विखे पाटील यांच्याकडे गाऱ्हाणी मांडली. ही सर्व निवेदने स्वीकारून त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. “लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी सतत जनतेच्या संपर्कात राहील,” असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

पालकमंत्र्यांनी थेट गावात येऊन, पारावर बसून लोकांच्या अडचणी ऐकून घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या तिन्हींचा समन्वय असणे गरजेचे असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या दौऱ्याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व युवक उपस्थित होते

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *