शिर्डी येथील सिद्ध शिव योगीपीठ अंतर्गत असलेल्या झरेकाठी शिव आश्रमात यावर्षीही महाशिवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. गेल्या २६ वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेने आता रौप्य महोत्सवी टप्पा ओलांडला असून, महंत ओम साई नागभूषण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद. तब्बल ९ क्विंटल साबुदाणा, ४ क्विंटल शेंगदाणे, ४ क्विंटल बटाटे आणि २५ डबे तेलाचा वापर करून ‘साबुदाणा वडा’ तयार केला जाणार आहे. यासोबत साडेसातशे किलो खजूर आणि साडेसातशे किलो दही असा शाही महाप्रसाद भाविकांना दिला जाणार आहे. या महाप्रसादासाठी विशेष स्वयंपाकी आणि स्वयंसेवकांची चमू कार्यरत आहे.
या उत्सवासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक आणि पंजाब या राज्यांतूनही मोठ्या संख्येने भक्तगण झरेकाठी परिसरात दाखल होणार आहेत. नागभूषण महाराजांनी सर्व भाविकांना या सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनासह ग्रामस्थही या नियोजनात हिरिरीने सहभागी झाले आहेत.
पाच एकर परिसरात विस्तारलेल्या या आश्रमात नारळ, चिकू, फणस, आंबा, पेरू, जांभूळ आणि चिंच अशा विविध वृक्षांच्या सानिध्यात एक रमणीय आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. आश्रमात महादेव, शनि महाराज, साईबाबा, दत्त महाराज, विठ्ठल रुक्मिणी, राधाकृष्ण, प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची भव्य मंदिरे आहेत. तसेच गोमाता आणि अश्व यांच्या मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. येथील ‘अग्निकुंड’ अखंडपणे प्रज्वलित असून त्यातून एक वेगळीच ऊर्जा भाविकांना मिळत आहे.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भव्य मंडप आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच अशोक वाणी, पोलीस पाटील सुदाम वाणी, डॉ. रंगनाथ गीते, निलेश कुटे, आदिनाथ वाणी, प्रसाद वाणी आणि सुधीर मामा यांच्यासह तरुणवर्ग परिश्रम घेताना दिसत आहेत. तर भक्ती, शक्ती आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम असलेल्या या सोहळ्यासाठी झरेकाठी नगरी शिवमय झाली आहे .