संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील पिंप्री लौकी-अजमपुर या परिसरातील सुमारे सहा ते सात हजार लोकसंख्येच्या ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याची दारे खुली करून देण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे दंत महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि ग्रामपंचायत पिंप्री लौकी यांच्या संयुक्त विद्यमानाने सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार व मोफत दंत चिकित्सा शिबिर नुकतेच संपन्न झाले.
ग्रामीण भागात आजही दंत आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा योग्य वेळी उपचार न मिळाल्याने रुग्णांना मोठे आजार अंगावर काढावे लागतात. हीच अडचण ओळखून प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने पिंप्री लौकी येथे अत्याधुनिक मशिन्स आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिरामुळे परिसरातील शेकडो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, गावातच मोफत सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेतून समाजप्रबोधन
सात दिवस चाललेल्या या शिबिरात दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गावात स्वच्छता मोहीम राबवली. तसेच आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. व्यसनमुक्ती हा या शिबिराचा मुख्य भाग होता. ‘दारू, तंबाखू, गुटखा आणि सिगारेट’ यांच्या सेवनामुळे शरीरावर होणारे घातक परिणाम विद्यार्थ्यांनी पथनाट्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. यासोबतच गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
या शिबिरासाठी विशेषतः ‘क्राफ्टन इंडिया’ (Krafton India) चे नॅशनल हेड विभोर सर आणि सी.एस.आर. हेड रुची मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संदीप, आकाश, नितीन आणि प्रमोद या मान्यवरांचीही उपस्थिती होती. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे दक्षिण कोरिया (Krafton च्या माध्यमातून) येथील तज्ज्ञ डॉक्टरांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.
शिबिरामध्ये डॉ. सुनील अडसुरे, डॉ. प्रशांत विरागी, डॉ. मानस बाजपेयी, डॉ. क्षितिज प्रधान, डॉ. समृद्धी शिंदे, डॉ. स्नेहल गाडेकर, डॉ. प्राची गडाख आणि डॉ. आकांक्षा चव्हाण या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारत पाटील गीते यांनी केले. ग्रामीण भागातील लोकांसाठी अशा शिबिरांचे महत्त्व किती मोठे आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिले.
या शिबिरासाठी गावातील बचत गटाच्या महिला, आशा सेविका, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत प्रशासन आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या या संयुक्त उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.