अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील प्रसिद्ध ‘अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल व महाविद्यालय’ यांच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी एका भव्य ‘महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ४५ दिवस चालणाऱ्या या शिबिरात विविध आजारांवर मोफत उपचार, पंचकर्म आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही एक मोठी आरोग्यदायी पर्वणी ठरणार आहे.
हे महाआरोग्य शिबिर सोमवार दि. १६ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, बुधवार दि. १ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. शिबिराची वेळ दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. या प्रदीर्घ कालावधीमुळे जास्तीत जास्त रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेता येणार आहेत.
या शिबिरात आयुर्वेदाच्या विविध विभागांमार्फत रुग्णांची तपासणी केली जाईल:
१. कायचिकित्सा व पंचकर्म: दमा, मधुमेह, जुनाट सर्दी, सांधे व मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, डोकेदुखी, कावीळ आणि त्वचाविकारांवर विशेष पंचकर्म उपचार केले जातील.
२. शल्यतंत्र विभाग: मूळव्याध, भगंदर यांसारख्या व्याधींवर सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये इंजेक्शन व शस्त्रक्रियेद्वारे उपचार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
३. शालक्य (नेत्र व ईएनटी): मोतीबिंदू, डोळ्यांवरील पडद्याच्या शस्त्रक्रिया तसेच कान, नाक आणि घसा या अवयवांच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातील.
४. स्त्रीरोग व प्रसुती: महिलांच्या विविध समस्या, सुलभ प्रसुती आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे मार्गदर्शन व उपचार केले जातील.
५. बालरोग विभाग: लहान मुलांमधील कुपोषण आणि बालदमा यांसारख्या आजारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
६. स्वस्थवृत्त विभाग: निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहार आणि जीवनशैली कशी असावी, याचे सविस्तर मार्गदर्शन या विभागातर्फे मिळेल.
.
हे शिबीर पूर्णपणे मोफत असून यामध्ये तपासणी, पंचकर्म उपचार आणि शस्त्रक्रियांचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. औषधांचा खर्च देखील अत्यंत नाममात्र दरात ठेवण्यात आला आहे, जेणेकरून गरीब व गरजू रुग्णांना याचा पूर्ण लाभ घेता येईल.
या महाआरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी डॉ. शुक्राचार्य वाघमोडे आणि प्रा. दत्ता शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



