भक्ती, शक्ती आणि निसर्गाचा अनोखा संगम; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील झरेकाठी येथील प्रसिद्ध शिवआश्रमात महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत उत्साहात, चैतन्यमयी आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या आश्रमात यंदा दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातून सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी शिवदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर आणि झरेकाठी नगरी दुमदुमून गेली होती.
झरेकाठी येथील शिवआश्रमात महाशिवरात्री उत्सवाची परंपरा गेल्या २६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. या परंपरेने यंदा रौप्य महोत्सवी टप्पा यशस्वीपणे ओलांडला असून, आश्रमाचे प्रमुख महंत ओम साई नागभूषण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. नागभूषण महाराजांनी सर्व भाविकांना आशीर्वाद देत या मंगल समयी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

पाच एकर परिसरात विस्तारलेला हा आश्रम म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. नारळ, चिकू, फणस, आंबा, पेरू, जांभूळ आणि चिंच अशा विविध फळझाडांनी आणि वृक्षराजींनी नटलेल्या या आश्रमात भाविकांना एक वेगळीच शांतता लाभते. आश्रमात महादेव मंदिरासह शनि महाराज, साईबाबा, दत्त महाराज, विठ्ठल रुक्मिणी, राधाकृष्ण, प्रभू श्रीराम आणि हनुमान यांचीही विलोभनीय मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांसमोर पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आश्रमातील गोमाता आणि अश्व यांच्या मूर्ती विशेष आकर्षणाचे केंद्र ठरल्या, तर येथील अखंड धगधगते ‘अग्निकुंड’ भाविकांना आध्यात्मिक ऊर्जेची प्रचिती देत होते.
महाशिवरात्री निमित्ताने मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता महादेव मंदिरात शास्त्रोक्त अभिषेक आणि विधीवत पूजेने झाली. त्यानंतर सकाळी ८ वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते. यामध्ये साबुदाणा वडा, दही आणि खजूर असा विशेष फराळी प्रसाद भाविकांना देण्यात आला. विशेष म्हणजे, गावातील महिलांनी एकत्र येत हजारो भाविकांसाठी साबुदाणा वडे बनविण्याचे सेवाकार्य अत्यंत उत्साहाने पार पाडले.
हा भव्य सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी झरेकाठी येथील सरपंच अशोक वाणी, पोलीस पाटील सुदाम वाणी, डॉ. रंगनाथ गीते, निलेश कुटे, आदिनाथ वाणी, प्रसाद वाणी आणि सुधीर मामा , वैभव भास्कर वाणी , शशिकांत रमेश वाणी , यश संजय वाणी ,जय संजय वाणी , अनिकेत पोपट वाणी , सूरज लक्ष्मण वाणी , अक्षय संजय वाणी , आनंद लहानु वाणी , संकेत दादासाहेब वाणी , दीपक आणा साहेब वाणी , यमन रामनाथ वाणी , अमोल लक्ष्मण वाणी , मिलिंद नानासाहेब वाणी ,जालिंदर नामदेव वाणी , जयदीप बापूसाहेब तोंडे , बाळासाहेब मच्छिंद्र वाणी , साई मधूकर वाणी , आदिनाथ वाणी यांच्यासह गावातील तरुण मंडळाने व स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. भक्ती, निसर्ग आणि निस्वार्थ सेवेचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात दिसून आला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण झरेकाठी परिसर शिवमय झाला होता.
