संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील एका गरीब कुटुंबातील तरुण मुलगी अहिल्यानगर (अहमदनगर) येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. कुमारी आकांशा रवींद्र निकम असे या मुलीचे नाव असून, सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज असून, पालकांनी समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे.

आकांशा निकम ही अहिल्यानगर येथील बोलेगाव फाटा एमआयडीसीमध्ये कामासाठी जात असताना हा अपघात झाला. एका भरधाव मोटरसायकलने आणि विटांनी भरलेल्या डंपरने तिला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आकांशाच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने अहिल्यानगर येथील झोपडी कॅन्टीन परिसरातील ‘मॅक्स सुपर हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ती अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहे.

अपघातानंतर विटांनी भरलेला डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे, तर दुचाकी चालक मदत करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आकांशाचे वडील रवींद्र चांगदेव निकम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. डंपर क्रमांक (MH 16 DP 7941) आणि दुचाकी क्रमांक (MH 20 FK 682) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झरेकाठी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे पाटील यांना माहिती दिली. मंत्र्यांनी या घटनेची दखल घेत संबंधित पोलीस निरीक्षकांना (PI) दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत

आकांशाचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. आतापर्यंत हॉस्पिटलचे बिल दीड लाख रुपयांच्या घरात गेले आहे. पुढील शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी आणखी ३ ते ४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. पैशांअभावी महत्त्वाची शस्त्रक्रिया रखडली आहे. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी वडिलांनी आणि भावाने समाजाकडे मदतीची याचना केली आहे.


जे दानशूर व्यक्ती किंवा संस्था आकांशाला मदत करू इच्छितात, त्यांनी निकम कुटुंबाशी संपर्क साधून आपला मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन झरेकाठी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed