आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम उघडली असून, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे केलेल्या एका कारवाईत १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी पोलीस ठाण्याचे पथक शनिवारी (दि. २१ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास हद्दीत गस्त घालत होते. पहाटे ५:१५ वाजेच्या सुमारास चिंचपूर चौफुली येथे पोलिसांना एक झेनॉन पिकअप वाहन संशयास्पद रित्या येताना दिसले. पोलिसांनी सदर वाहन अडवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परवाना नसलेला बेकायदेशीर वाळू साठा मिळून आला.

या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन आणि अंदाजे ३ हजार रुपये किमतीची अवैध वाळू, असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक मयुर वेळेस याच्यासह एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २९/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र पारथी करत आहेत.

आश्वी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सुदाम शिरसाट यांनी अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. “पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे कोणतेही अवैध वाळू उपसा तसेच गौण खनिज वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. तस्करांना आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची विशेष मोहीम आणि कडक कारवाई सुरूच राहील,” असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

आश्वी आणि परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होते. महसूल आणि पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत होता. मात्र, नवनियुक्त अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी दाखवलेल्या या तडफेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता ही कारवाई केवळ सुरुवातीचा ‘धडाका’ ठरते की अवैध वाळू तस्करी कायमची बंद होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed