आश्वी । झुंझार न्यूज

संकटकाळात एकमेकांना मदत करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील रहिवासी आकांक्षा रवींद्र निकम ही तरुणी अहिल्यानगर येथे झालेल्या एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाली असून, तिच्या उपचारासाठी ह.भ.प. दत्त गिरी महाराज यांनी आपल्या कीर्तनाचे संपूर्ण मानधन दान करून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

झरेकाठी येथील आकांक्षा निकम हिचा काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे अपघात झाला होता. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकांक्षाची घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्या उपचाराचा मोठा खर्च पेलणे निकम कुटुंबासाठी कठीण झाले होते. ही माहिती मिळताच परिसरातून मदतीचे आवाहन करण्यात येत होते.

ह.भ.प. दत्त गिरी महाराज यांना जेव्हा आकांक्षाच्या परिस्थितीबद्दल समजले, तेव्हा त्यांनी विलंब न लावता मदतीचा हात पुढे केला. त्यांनी रविवारी पार पडलेल्या आपल्या कीर्तनातून मिळालेले संपूर्ण मानधन आकांक्षाच्या औषधोपचारासाठी देण्याचा निर्णय घेतला. हे मानधन त्यांनी पत्रकार सोमनाथ डोळे यांच्याकडे सुपूर्द केले, जेणेकरून ते तातडीने संबंधित कुटुंबापर्यंत पोहोचू शकेल.

या सामाजिक कार्यात पत्रकार सोमनाथ डोळे यांनीही पुढाकार घेतला असून, ते आकांक्षाच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाराजांनी दिलेली ही मदत एका गरीब कुटुंबासाठी मोठा आधार ठरली आहे.

आकांक्षाची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून तिच्या पुढील उपचारासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. दत्त गिरी महाराजांनी दाखवलेल्या या दातृत्वाचा आदर्श घेऊन इतर दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन निकम कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे.


दत्त गिरी महाराजांच्या या संवेदनशील निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, “कीर्तन केवळ वाचेने नाही तर कृतीनेही समाजप्रबोधन करते,” हे त्यांनी सिद्ध केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed