​आश्‍वी । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातून एका अल्पवयीन मुलीला चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न पोलीसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आरोपीचा पाठलाग केला आणि वडगावपान परिसरात त्याला ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका केली.

 

पोलीसांकडून ​मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास आश्‍वी पोलीस स्टेशन हद्दीतील गावातून एका अल्पवयीन मुलीला काही अज्ञात व्यक्ती चारचाकी वाहनात बसवून पळवून नेत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांना मिळाली.

 

​घटनेचे गांभीर्य ओळखून शिरसाट यांनी तात्काळ पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश आहेर आणि सचिन सातपुते यांच्यासह आरोपीच्या मागवर निघाले. ​यावेळी त्यांनी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनाही घटनेचे गांभीर्य कळवून सतर्क केले. घटनेची माहिती मिळताच साळुंखे देखील आपल्या ताफ्यासह आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. आश्‍वी आणि संगमनेर तालुका पोलिसांनी वडगावपान शिवारातून संयुक्तपणे मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. तसेच पीडित मुलीची सुखरूप सुटका केली आहे.

 

​याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश शेळके (वय – २७, रा. पोटा, जि. हिंगोली) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध आश्‍वी पोलीस ठाण्यात गु.रं.न. ३२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७(२), ८७ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

तर, गाडी चालकांचा देखील पोलीस कसून शोध घेत असून सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हे स्वतः या गुन्ह्याचा तपास करत आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed