संगमनेर । झुंझार न्यूज
सात्रळ येथील ‘आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये थोर मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय परिसरात मराठी भाषेचा अभिमान, समृद्ध संस्कृतीचे जतन आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा जागर अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश पन्हाळे हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे चेअरमन डॉ. के. के. बोरा, विश्वस्त सौ. लिलावती बोरा, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अर्चना, प्राचार्या प्रधान आदि मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून “मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती, गौरवशाली इतिहास आणि मूल्यांची वाहक आहे,” असा प्रभावी संदेश दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सुश्राव्य सादरीकरण करून उपस्थितांना संत साहित्याच्या गोडव्याची प्रचिती दिली. तसेच, कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद केले. महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शवणाऱ्या ‘लोकधारा’ नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. पोवाडा, लावणी आणि कोळीगीत अशा विविध कलाप्रकारांतून मराठी मातीचा सुगंध कार्यक्रमात दरवळला.
प्रमुख पाहुणे मोहिनीराज तुंबारे म्हणाले की, “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहणे आवश्यक आहे. मोबाईलमुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, तरी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय लावून घ्यावी. दर्जेदार मराठी साहित्याचे वाचन केल्यानेच विचारांची प्रगल्भता वाढेल.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. रमेश पन्हाळे यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत, आधुनिक इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत असताना आपल्या मातृभाषेचा आणि संस्कारांचा विसर पडू देऊ नका, असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. कविता जोर्वेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मंजूषा घोलप यांनी मानले. या सोहळ्याला शाळेचा सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



