पथक थेट राज्याबाहेर रवाना
वादग्रस्त विधान करणाऱ्यांच्या घरी जाऊन बजावणार नोटीस
शिर्डी । झुंझार न्यूज
देश-विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांबद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणे आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्यांविरुद्ध शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आता अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी संस्थानचे सुरक्षा पथक थेट संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना न्यायालयीन आणि पोलीस नोटीस बजावणार आहे. संस्थानच्या या ‘धडक’ कारवाईमुळे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मागील काही काळापासून फेसबुक, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही व्यक्तींकडून साईबाबांच्या जीवनचरित्राबद्दल आणि त्यांच्या स्वरूपाबद्दल चुकीची तसेच आक्षेपार्ह विधाने केली जात होती. अनेक साईभक्तांनी याबद्दल संताप व्यक्त करत संस्थानकडे तक्रारी केल्या होत्या. यापूर्वी उत्तर भारतातील काही लोकांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केले होते, ज्यांच्यावर संस्थानने कायदेशीर कारवाई केली आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून राहाता न्यायालयात दावेही दाखल आहेत.
विशेष म्हणजे, आता केवळ गुन्हे दाखल करून संस्थान थांबलेले नाही. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील १० जण सातत्याने साईबाबांबद्दल चुकीची माहिती पसरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या १० जणांना नोटीस देण्यासाठी संस्थानचे सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आपल्या पथकासह शुक्रवारी दक्षिण भारतासाठी रवाना झाले आहेत. हे पथक थेट संबंधितांच्या घरी जाऊन त्यांना पोलिसांची नोटीस बजावणार आहे.
यापूर्वी दिल्लीतील पंडित अजय गौतम यांनी साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना नोटीस बजावल्यानंतर, त्यांना शिर्डीत हजर व्हावे लागले होते. त्यांनी न्यायालयात लेखी माफीनामा सादर केला आणि साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आरतीलाही उपस्थिती लावली होती. या उदाहरणावरून संस्थानने आता कायदेशीर लढाई अधिक तीव्र केली आहे.
आजच्या काळात सोशल मीडियावर नकारात्मकतेला लवकर प्रसिद्धी मिळते आणि त्यातून आर्थिक कमाई होते. याच मोहापायी अनेक तरुण चुकीच्या माहितीचा आधार घेत आहेत, असे मत सोशल मीडिया सल्लागार सुकृत मिराणे यांनी व्यक्त केले. त्यांनी तरुणांना आवाहन केले की, सकारात्मक आशय तयार करूनही पैसे कमवता येतात, त्यामुळे धार्मिक भावना दुखावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये.

काही मोजक्या लोकांमुळे साईबाबांच्या महतीवर किंवा शिर्डीतील गर्दीवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट, जगभरातील साईभक्तांची श्रद्धा अधिक दृढ होत असून शिर्डीत येणाऱ्या भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. “साईबाबा हे कोट्यवधींचे दैवत आहेत आणि त्यांच्याबद्दलचा अपप्रचार भक्त कधीही सहन करणार नाहीत,” अशी भावना संस्थानकडून व्यक्त करण्यात आली आहे.


