संगमनेर नगरपरिषद आणि प्रजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बजेट व नियोजन’ विषयावर कार्यशाळा संपन्न

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी जर कायद्याची तांत्रिक माहिती आणि तरतुदींचा सखोल अभ्यास केला, तर त्यांना जनतेचे प्रश्न सभागृहात अधिक प्रखरपणे आणि प्रभावीपणे मांडता येतील. कायद्याचे ज्ञान हे लोकप्रतिनिधींसाठी एक महत्त्वाचे शस्त्र असून, त्यातूनच पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन घडते, असे प्रतिपादन संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले.

संगमनेर नगरपरिषद आणि ‘प्रजा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिकेचे बजेट, नियोजन आणि कायदेशीर चौकट या विषयावर आयोजित विशेष कार्यशाळेत त्या बोलत होत्या. संगमनेर नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला शहरातील सर्व नगरसेवक आणि संबंधित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक प्रभावी, जबाबदार आणि कायदेशीर चौकटीत कसे राबवता येईल, यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ या कायद्यातील महत्त्वाच्या कलमांचा अभ्यास, नगरसेवकांची नेमकी भूमिका, विविध विषय समित्यांचे महत्त्व आणि सभागृहातील कामकाजाची शिस्तबद्ध पद्धत यावर प्रजा फाउंडेशनच्या वतीने सखोल सादरीकरण करण्यात आले.

कार्यशाळेला संबोधित करताना डॉ. मैथिली तांबे पुढे म्हणाल्या की, बजेट संदर्भातील सूक्ष्म नियोजन, उपलब्ध निधीचा कार्यक्षम वापर आणि विकासकामांमध्ये जनसहभाग वाढवणे ही काळाची गरज आहे. अशा प्रशिक्षणांमुळे लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता वाढून प्रशासन अधिक पारदर्शक होण्यास मदत होते.

नगरसेवकांना केवळ तात्विक माहिती न देता व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले. जनतेचे प्रश्न सभागृहात विचारण्याचे कौशल्य, प्रश्नांची मांडणी करण्याची पद्धत आणि कायद्याचा अचूक अर्थ लावून विकासकामांचा पाठपुरावा कसा करावा, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.


या उपक्रमामुळे आगामी काळात संगमनेर शहरातील विकासकामे अधिक परिणामकारक, गतीमान आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संगमनेर नगरपरिषदेचे कर्मचारी आणि प्रजा फाउंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *