दाढ बुद्रुक येथे यात्रेचा उत्साहात शुभारंभ; सामाजिक सलोखा आणि गावच्या विकासाचा दिला मंत्र
आश्वी । झुंझार न्यूज
आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित परंपरा नसून, ती सर्व धर्मांना आणि विचारांना एका सूत्रात बांधणारा उत्सव आहे. प्रवरा परिसराची खरी ओळख ही सर्वधर्मीय एकात्मतेची आहे आणि येथे धर्माच्या नावावर कोणताही भेदभाव कधीच होऊ दिला जाणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे आदन मदन बाबा यात्रेचा श्रीफळ वाढवून औपचारिक शुभारंभ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक वाघ , प्रवरा उद्योग समूहाचे पदाधिकारी, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, यात्रा उत्सव समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली आदन मदन बाबा ही यात्रा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पुन्हा सुरू करण्यात आली. यंदा या यात्रेचे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीबद्दल आणि शांततेत पार पडलेल्या उत्सवाबद्दल डॉ. विखेंनी सर्वांचे कौतुक केले. ते म्हणाले की, मागील वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही यात्रा भव्य स्वरूपात पार पडली. यावर्षीही हाच उत्साह आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
समाजातील शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यावर भर देताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपल्या धर्माचे सण साजरे करण्याचा अधिकार आहे, पण ते करताना इतरांच्या भावनांचा आदर राखणे हीच खरी माणुसकी आहे. जो माणूस चुकीला माफी देतो, तो चूक करणाऱ्यापेक्षाही मोठा असतो. त्यामुळे यात्रेदरम्यान सर्वांनी संयम राखून, शांतता टिकवून ही परंपरा अधिक भक्कम करावी.

यात्रेच्या निमित्ताने डॉ. विखेंनी दाढ बुद्रुक गावातील प्रलंबित प्रश्नांवर आणि नियोजित कामांवरही प्रकाश टाकला. आदन मदन बाबा प्रांगणात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन एक नियोजनबद्ध नवीन वास्तू उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यासोबतच गावात शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी करणे, स्मशानभूमीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणे आणि संरक्षक भिंत बांधणे ही कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढील वर्षी ही यात्रा अधिक सुसज्ज आणि भव्य स्वरूपात साजरी करण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.
पाडव्याच्या पाचव्या दिवसापासून यात्रेला सुरुवात होवून तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसांत विखे परिवारातील सदस्यही यात्रेला उपस्थित राहून ग्रामस्थांचा उत्साह वाढवतील, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
आपली एकजूट हीच आपली खरी ताकद आहे. ही एकात्मता अबाधित ठेवणे हीच आदन मदन बाबा यात्रेची खरी परंपरा आहे. ही यात्रा संपूर्ण समाजाला एकतेचा संदेश देते.




