आश्वी खुर्द येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘न्याय नगरी सहकारी पतसंस्थे’चे थाटात उद्घाटन

आश्वी । झुंझार न्यूज

ग्रामीण भागातील अर्थकारण हे प्रामुख्याने शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी सागर गीते यांनी सुरू केलेली ‘न्याय डेरी’ आणि ‘न्याय नगरी पतसंस्था’ अत्यंत फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन श्री क्षेत्र उंबरेश्वरचे महंत दत्तगिरी महाराज यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे ‘न्याय नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित’ या शाखेचे उद्घाटन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महंत दत्तगिरी महाराज उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे होते.

आधुनिक तंत्रज्ञान आणि मुक्त संचार गोठा काळाची गरज: सागर गीते

याप्रसंगी गीते मिल्क, ॲग्रो प्रोडक्ट, न्याय डेरी आणि न्याय नगरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर गीते यांनी उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आजच्या काळात पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करणे परवडणारे राहिलेले नाही. दुग्ध व्यवसायात मोठी प्रगती साधायची असेल, तर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. विशेषतः ‘मुक्त संचार गोठा’ ही काळाची गरज असून, यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादनातही वाढ होते.” शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या सोहळ्याला पतसंस्थेचे अध्यक्ष अमोल आव्हाड, उपाध्यक्ष सौ. प्रज्ञा सागर गीते, डॉ. रवींद्र दराडी, नंदू कांगणे, अंबादास घुगे, राजेंद्र गीते, विजय पोपळघट, दादा हरी गीते, अनुसया गीते, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे वसुली अधिकारी अनिल पाटील, आदर्श नगरी पतसंस्थेचे (राहुरी) ज्ञानेश्वर सोनवणे, रमेश शेठ गीते , अश्विनी पतसंस्थेचे अध्यक्ष मेजर संपतराव सांगळे, बाळासाहेब डहाळे, अशोक गीते, संजय बिडवे, प्रा. फड, येस बँकेचे मॅनेजर अमोल हारदे, ग्रामविकास अधिकारी किशोर मांढरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महंत दत्तगिरी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात सागर गीते यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील तरुणांनी अशा प्रकारे एकत्र येऊन संस्था उभारल्यास खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार प्रदर्शन सोमनाथ डोळे यांनी केले. या नवीन शाखेमुळे आश्वी परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *