धर्माच्या नावाखाली समाजाचे शोषण करणे अत्यंत क्लेशदायक आहे. कर्तव्यदक्ष महिला पोलिस आधिकारी तेजस्विनी सातपुते या घटनेची सखोल चौकशी करुन, नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात घटनेतील सर्व पाळेमुळे पोलिस प्रशासनाच्या चौकशीतून समोर येतील असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, कॅप्टन अशोक खरात यांच्या सर्व भानगडी या निषेधार्ह आहेत. समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली ही विकृती आहे. त्यांनी कोणाची कशी फसवणूक केली, कोणाच्या प्रोपर्ट्या बळकावल्या हे सर्व तपासातून समोर येईल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी कर्तव्यदक्ष महिला पोलिस आधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक नेमले आहे.
कॅप्टन अशोक खरात यांच्या मंदिराच्या ट्रस्टमधील कोणी दोषी असेल तर त्यांचीही चौकशी झाली पाहीजे. कारण या घटनेचा तिव्र संताप संपूर्ण राज्यात व्यक्त होत आहे. पोलिसांनी काही व्हीडीओ जप्त केले आहेत. या व्हीडीओ मध्येही कोणत्या व्यक्ति आहेत, याचीही पोलिस घेतील असे मंत्री विखे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
वडगावपान येथील घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपीचा तपास पोलिस अजूनही घेत आहेत. शाळेच्या गेटवर सीसीटीव्ही आहेत की नाही हा सुध्दा प्रश्न आहे. घटनेच्या संदर्भात गावातील काही व्यक्तिंना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले होते. पण यातून काही निष्पन्न झाले नाही. कोणी बाहेरचा व्यक्ति आहे का असाही संशय पोलिसांना येत असून, हा तपास पुर्णत्वास जावा यासाठी पोलिस आधिका-यांच्या संपर्कात असून, पाठपुरावाही सुरु असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच ग्रामपंचायतींनी गावामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी सुचित केले.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांना पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून, स्थायी आदेशाप्रमाणे मदतीचा निर्णय प्रशासनाच्या पातळीवर होईल असे त्यांनी स्पष्ट केले.