डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

लोणी । झुंझार न्यूज 

भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून, लोणी येथे ‘भावड्या’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले.

ग्रामीण पार्श्वभूमी आणि संघर्षाची गाथा असलेल्या या चित्रपटाबद्दल संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या सोहळ्याप्रसंगी लोणी पोलीस स्टेशनचे पीएसआय कैलास वाघ साहेब, माजी सरपंच अनिल विखे, युवा नेते योगेश (बंटी) आहेर, सोमनाथ डोळे यांसह चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. यात प्रमुख अभिनेत्री नीता कांबळे, अभिनेता व दिग्दर्शक प्रमोद पंडित, लेखक-अभिनेता ज्ञानदेव शिंदे, अभिनेता ज्ञानेश्वर मोहिनीराज थोटे, अभिनेता रज्जाक शेख आणि ज्येष्ठ अभिनेता-लेखक आनंदा साळवे यांचा समावेश होता.

‘भावड्या’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मुख्य भूमिका साकारणारे प्रमोद पंडित यांच्या स्वतःच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. एका सामान्य तरुणाचा जीवनप्रवास, त्याचे चढ-उतार आणि ग्रामीण भागातील वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण ग्रामीण भागात झाल्यामुळे मातीतील अस्सल सुवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक नवोदित स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी दिली आहे. “आपल्या भागातील टॅलेंटला मोठ्या पडद्यावर स्थान मिळावे आणि ग्रामीण संस्कृती जगासमोर यावी,” हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी पोस्टर अनावरण प्रसंगी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ग्रामीण जीवनावर आधारित चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात, तसाच ‘भावड्या’ देखील यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोस्टरमधील जबरदस्त लूक आणि ग्रामीण बाज यामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून, प्रेक्षक आता चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *