संगमनेर तालुक्यात सध्या राजकीय आणि प्रशासकीय वातावरण कमालीचे तापले आहे. संगमनेर पंचायत समितीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘कामबंद’ आंदोलन पुकारले आहे, तर दुसऱ्या बाजूला महिला कर्मचाऱ्याशी झालेल्या गैरवर्तनाचा आरोप करत शेकडो महिलांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनसमोर ४ तास ठिय्या आंदोलन केले. या दुहेरी संघर्षामुळे तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर पंचायत समितीमधील ‘सी आर पी’ (CRP) महिला बचत गटाचे समुदाय संसाधन अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपट कोकाटे यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार शरद नाना थोरात, त्यांचा मुलगा, पुतण्या आणि इतर ८ ते १० जणांनी कोकाटे यांना ‘फिल्मी स्टाईल’ने मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. या मारहाणीत कोकाटे जखमी झाले असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा निषेध करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) आणि सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कामबंद आंदोलन सुरू केले. या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत, बुधवारपासून सर्व कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती लावून कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत हल्लेखोरांवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे अधिकारी मारहाणीचा निषेध करत असतानाच, दुसरीकडे शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. एका महिला ‘सीआरपी’ कर्मचाऱ्याने आरोप केला आहे की, मागील १० महिन्यांपासून तिचे मानधन मिळालेले नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी ती वरिष्ठ अधिकारी (कोकाटे) यांच्याकडे गेली असता, संबंधित अधिकाऱ्याने तिच्याशी अत्यंत गैरवर्तन केले.
या अन्यायाची दाद मागण्यासाठी ही महिला आपल्या पती व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह गेली असता वादावादी झाली. मात्र, पोलीस प्रशासन या पीडित महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे आणि सौ. पद्माताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी पोलीस स्टेशनसमोर ४ तास ठिय्या दिला.
ठिय्या आंदोलनादरम्यान बोलताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या, “महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडत आहे. १० महिने मानधन न मिळणे आणि विचारणा केल्यावर अधिकाऱ्याने गैरवर्तन करणे हा महिलांचा अपमान आहे. पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? तक्रार नोंदवण्यासाठी रात्रभर थांबवूनही दखल घेतली जात नाही, हे दुर्दैवी आहे.”
या आंदोलनादरम्यान महिलांनी पंचायत समितीच्या कारभारावर गंभीर आरोप केले. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि बचत गटाच्या महिलांना राजकीय कार्यक्रमांसाठी सक्ती केली जाते, असा खळबळजनक दावाही यावेळी करण्यात आला.
तालुक्यात वाळू तस्करी, गुंडागर्दी आणि महिलांवरील अन्याय वाढत असल्याची चर्चा आता ‘संगमनेर फाईल्स’ या नावाने तालुक्यात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
पोलीस प्रशासनाने तक्रार घेण्याबाबत दाखवलेल्या उदासीनतेमुळे महिला अधिकच आक्रमक झाल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मात्र, दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने वातावरण अद्याप निवळलेले नाही.
एकीकडे सरकारी अधिकाऱ्याला झालेली मारहाण आणि दुसरीकडे महिला कर्मचाऱ्याचा स्वाभिमान, अशा पेचात संगमनेर प्रशासन अडकले आहे. आता पोलीस या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.