अध्यात्म आणि भक्तीच्या नावाखाली भोळ्याभाबड्या जनतेला लुटणाऱ्या भोंदूबाबांचा सुळसुळाट थांबण्याचे नाव घेत नाहीये. नाशिकचा कथित भोंदूबाबा अशोक खरात याने श्रद्धेचा बाजार मांडून तब्बल ३०० कोटींहून अधिकची माया जमा केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ३०० रुपयांचा दगड ‘चमत्कारी खडा’ म्हणून २ ते ३ लाखांना विकणाऱ्या या भोंदूबाबाने केवळ भक्तांचे पैसेच नाही, तर अनेक महिलांची अब्रूही लुटल्याचे गंभीर आरोप होत आहेत.
पाथर्डी ते शिर्डी… जमिनींचा अजस्र डोंगर
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जमिनींचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. त्याच्या नावावर आणि जवळच्या लोकांच्या नावे असलेल्या मालमत्तेची यादी पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
खरातची काही प्रमुख मालमत्ता खालीलप्रमाणे:
पाथर्डी (नाशिक): १५० कोटी रुपये किमतीची ३० एकर जमीन. सिन्नर (कहांडळवाडी): ४५ एकर जमीन (किंमत अंदाजे ५ कोटी). गौळाणे (नाशिक): ३० कोटींहून अधिक किमतीची जमीन आणि मोक्याच्या ठिकाणी १५ भूखंड. शिर्डी परिसर: शिर्डी आणि पानमळा परिसरात ७० कोटींहून अधिक किमतीचे भूखंड आणि ३० गुंठ्याची जागा. अहिल्यानगर (अहमदनगर): ५ एकरचा कोट्यवधींचा भूखंड. निघोज: ४ एकरची कोट्यवधींची जमीन. इतर जागा: ओझर विमानतळाजवळ ५ कोटींची जमीन, जानोरी आणि दहावा मैल भागात मोक्याच्या जागा. आलिशान बंगले, फ्लॅट्स आणि ऑफिस केवळ जमिनीच नाही, तर राहणीमानही अत्यंत विलासी होते. नाशिकच्या कर्मयोगीनगरमध्ये ५ कोटींचा आलिशान बंगला असून, शहरातील कॅनडा कॉर्नरसारख्या उच्चभ्रू भागात १ कोटींचे ऑफिस आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे ३० फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नरमध्ये व्यापारी गाळे आणि दुकानेही त्याने थाटली आहेत. मिरगाव येथील फार्महाऊसची किंमत १० कोटींहून अधिक असून, तिथे लाखांची रोख रक्कमही सापडल्याचे समजते.
अशोक खरात हा लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या नावाखाली त्यांना जाळ्यात ओढायचा. बाजारामध्ये अवघ्या २०० ते ३०० रुपयांना मिळणारा खडा हा ‘दैवी शक्ती’ असलेला असल्याचे सांगून तो भक्तांना २ ते ३ लाख रुपयांना विकायचा. घराची शांती, व्यवसायात वृद्धी किंवा आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून त्याने हजारो लोकांची फसवणूक केली.
धक्कादायक: राजकीय नेत्यांच्या कुटुंबांनाही जाळ्यात ओढले
या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या भोंदूबाबाने केवळ सामान्य जनतेलाच नाही, तर अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातही शिरकाव केला होता. राजकीय नेत्यांच्या पत्नींना प्रलोभने दाखविल्याचे गंभीर आरोप आहेत. काही प्रकरणांत त्याने महिलांना मुले जन्माला घालण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचीही धक्कादायक चर्चा आहे.
ट्रस्टच्या नावाखाली काळा पैसा पांढरा?
खरात याच्या ‘इशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’ची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांच्या घरात आहे. भक्तीच्या नावाखाली येणारी देणगी आणि फसवणुकीतून आलेला पैसा या ट्रस्टच्या माध्यमातून फिरवला जात असल्याचा संशय आहे.
अशोक खरातच्या या कृष्णकृत्यांचा भांडाफोड झाल्यानंतर नाशिकसह परिसरात संतापाची लाट आहे. पीडित महिला आणि फसवणूक झालेले भक्त आता हळूहळू समोर येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, त्याच्या मालमत्तेची ईडी (ED) किंवा आयकर विभागामार्फत चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा हा ‘काळा धंदा’ पाहून समाजात पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी होत आहे.