मुंबई । झुंझार न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पार पडलेल्या दिमाखदार समारंभात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

व्यसनमुक्ती चळवळीत डॉ. गिते यांनी केलेल्या उल्लेखनीय व प्रभावी कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला. समाजजागृती, मार्गदर्शन आणि जनप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना व्यसनाच्या अंधःकारातून बाहेर काढत नवजीवन दिले आहे. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशाबद्दल राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. गिते यांचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरवले गेले असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या कार्याची नोंद झाली आहे. व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, सेवादूत पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा आयकॉन पुरस्कार यांसारख्या सन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

“व्यसनामुळे उद्ध्वस्त होत असलेली अनेक कुटुंबे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली, त्यांच्या वेदना जवळून अनुभवल्या… आणि त्यातूनच मनात ठाम निर्धार निर्माण झाला की समाजासाठी काहीतरी करायलाच हवे. त्या भावनेतूनच व्यसनमुक्तीच्या कार्याची सुरुवात केली. गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करत असताना अनेकांना व्यसनाच्या अंधःकारातून बाहेर काढून नवजीवन देण्याचा प्रयत्न केला, हीच माझी खरी कमाई आहे.
.
हा पुरस्कार केवळ माझा नसून त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे, ज्यांनी व्यसनावर मात करून नव्याने आयुष्य उभारले. त्यांच्या जिद्दीला आणि नव्या सुरुवातीला हा सन्मान अर्पण आहे. या पुरस्कारामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली असून, पुढेही अधिक समर्पणाने आणि जिद्दीने कार्य करत राहीन.
तसेच, या पुरस्काराची संपूर्ण रक्कम आणि तितकीच माझ्या वतीने भर घालून स्वर्गीय आई वेणूताई यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी देणगी देत आहे. तिच्या संस्कारांचीच ही प्रेरणा आहे,” असे डॉ. गिते यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
