आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रुक येथे श्री रामनवमीनिमित्त भगवान प्रभू रामचंद्र जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मीय भाविकांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.

 

आश्वी बुद्रुक येथील शिव छत्रपती प्रतिष्ठान, ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आश्वीच्या मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण गावातून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत शेकडो तरुण ‘एकही नारा, एकही नाम, जय श्रीराम-जय श्रीराम’चा जयघोष करत सहभागी झाले होते. महिलांनी ठिकठिकाणी रथाचे औक्षण करून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आश्वी बुद्रुक येथील भव्य अशा श्रीराम मंदिरात हा मुख्य सोहळा पार पडला. मंदिर प्रांगणात आकर्षक मंडप आणि सुंदर रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती. दुपारी रामजन्मानंतर महिलांनी प्रभू श्रीरामांच्या चांदीच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा हलविला. त्यानंतर झालेल्या महाआरतीत सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

या उत्सवाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गावात दिसलेला जातीय सलोखा. रामनवमीनिमित्त दिवसभर बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, मुस्लिम समाजातील बांधवांनी देखील या प्रसादाच्या वाटपात सक्रिय सहभाग घेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले. केवळ आश्वी बुद्रुकच नव्हे, तर परिसरातील अन्य गावांतील भाविकांनीही या सोहळ्याचा आनंद घेतला.


या मंगलमय प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजयराव हिंगे, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच बाळासाहेब मदने, पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर, प्रा. कान्हू गीते, प्रा. अशोक गीते, माजी उपसरपंच राहुल जऱ्हाड, सुमतीलाल गांधी, संतोष ताजणे, अभिषेक ताजणे, अझरभाई शेख, अभिजीत गायकवाड, भिमा शिंदे, नवनाथ ताजणे, बाळासाहेब गायकवाड, अनिल म्हसे, गणेश खेमनर यांच्यासह शिव छत्रपती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली. आश्वी परिसरात या भव्य उत्सवाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *